पेण नगर परिषदेची दोन कोटी 50 लाखांची तरतूद
पेण : प्रतिनिधी
शहरातील म्हाडा वसाहत परिसरात सुमारे दोन कोटी, पन्नास लाख खर्च करून उभारण्यात येत असलेल्या थीम पार्कचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तरणतलावापाठोपाठ थीम पार्कच्या कामामुळे पेण शहरातील नागरिकांना विरंगुळ्याची आणखी एक सुविधा उपलब्ध होणार आहे. शहरात थीम पार्क व्हावे, यासाठी नगराध्यक्ष प्रितम पाटील यांचा गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरु होता.
पेणचा समावेश ‘क‘ वर्ग नगर परिषदेत होतो, असे असतानासुद्धा शहराच्या विकास कामांमध्ये थीम पार्कचा समावेश करण्यात आला होता. रामेश्वर कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीने 2016मध्ये थीम पार्कचे उभारण्याचे काम हाती घेतले होते. या कामाचे भूमिपूजन माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी केले होते. एक एकर क्षेत्रावर साकार होत असलेल्या या थीम पार्कमध्ये जॉगिंग ट्रॅक, नाना-नानी पार्क, बच्चे कंपनीसाठी खेळण्याची जागा, सभोवार फुलझाडे, उद्यान, ओपन जीम, स्वच्छतागृह, ग्रंथालय, ओपन थीएटर, 20 गुंठे क्षेत्रावर प्रशस्त हिरवळ, योगा करण्यासाठी मेडीटेशन सभागृह आदींची निर्मिती करण्यात आली आहे.
थीम पार्कच्या अंतिम टप्प्यातील कामांवर शेवटचा हात फिरवण्याचे काम बाकी असून, ते लवकरच पूर्ण करण्याचा पेण नगर परिषद प्रशासनाचा मानस आहे. येत्या 15 ऑगस्ट 2019 रोजी थीम पार्कचे लोकार्पण करण्याचा प्रयत्न असल्याचे नगर परिषद सूत्रांनी सांगितले.