Breaking News

उसतोड कामगाराचा मुलगा जाणार जर्मनीला

कर्जत : बातमीदार

नेरळ येथील कोतवालवाडी ट्रस्टच्या वसतिगृहात राहून शिक्षण घेतलेला ऊसतोड कामगारांचा मुलगा अभियांत्रिकीमधील उच्च शिक्षण घेण्यासाठी जर्मनीला निघाला आहे. पालघरमधील एका ट्रस्टने त्या विद्यार्थ्यांला उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत केली आहे. सोमवारी (दि. 15) या विद्यार्थ्याला शुभेच्छा देण्यात आल्या. उत्तरेश्वर शेप हा बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगाराचा मुलगा. मुलांना आपल्याप्रमाणे काम करावे लागू नये, यासाठी त्याचे आई वडील कुटुंबासह नेरळला  आले. नेरळमध्ये स्वातंत्र्यसैनिक हरिभाऊ भडसावळे यांनी सुरू केलेल्या कोतवालवाडी ट्रस्टच्या वसतीगृहात राहून शेप यांची मुले शिक्षण घेत आहेत. त्यातील उत्तरेश्वर  याने नेरळ विद्यार्थी मंदिर आणि नेरळ विद्या भवनमध्ये माध्यमिक शिक्षण घेऊन कर्जतच्या कोकण ज्ञानपीठमध्ये मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नोकरी करीत त्याने पाच लाख रुपये गोळा केले आणि जर्मनीमधील एका विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी जमा केले. मात्र प्रवेश नक्की करण्यासाठी उत्तरेश्वरला आणखी दोन लाख रुपयांची आवश्यकता होती. त्याने ही गोष्ट ट्रस्टच्या विश्वस्त संध्या देवस्थळे-भडसावळे यांना सांगितले. संध्या देवस्थळे-भडसावळे यांनी पालघर जिल्ह्यातील समता फाउंडेशन सोबत संपर्क केला. फाउंडेशनच्या रवी अग्रवाल आणि रुचा अग्रवाल यांनी  उत्तरेश्वर शेप याला आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एका दिवसात सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन जर्मनीमधील विद्यापीठात पैसे पाठवून दिले. उच्च शिक्षणासाठी जर्मनीला निघालेल्या उत्तरेश्वरला शुभेच्छा देण्यासाठी सोमवारी कोतवालवाडी ट्रस्टमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी  समता फाउंडेशनचे रवी अग्रवाल, रुचा अग्रवाल,  कोतवालवाडी ट्रस्टच्या विश्वस्त संध्या देवस्थळे, अधीक्षक अनंता झुगरे, समन्वयक भारती, नेरळ विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष विवेक पोतदार, कार्यकारिणी सदस्य सूर्यकांत जाधव, प्राचार्य पी. बी. विचवे, नेरळ विद्या भवनच्या मुख्याध्यापिका अनघा जोगळेकर, शिक्षक हनुमंत भोईर, संतोष कांबरी, माजी विद्यार्थी ज्ञानेश्वर फोपे, गोपीनाथ फोपे, डॉ. दिलीप नेहरकर, अंजु पारधी, रोहिणी झुगरे, अभिश्री कांबळे, मयुरी वाघ, पम्पेन फर्नाडिस यांच्यासह शेप यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply