माय मराठी फाऊंडेशनचा पुढाकार
नवी मुंबई ः वार्ताहर
नवी मुंबई शहरातील विविध सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्या मान्यवरांचा माय मराठी फाऊंडेशनकडून घरोघरी जाऊन सन्मान करण्यात आला.कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने नियोजित कार्यक्रम रद्द करून घरीच उत्कृष्ट कार्य करणार्यांचे कौतुक केल्याचे माय फाऊंडेशनचे अध्यक्ष मंगेश मिस्किन यांनी सांगितले.
शिक्षण, पोलीस, रुग्णसेवा, डॉक्टर, रुग्णसेवक, सामाजिक संस्था, नाट्य, सिनेक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या घटकांना दरवर्षी मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून माय मराठी फाऊंडेशनच्या वतीने सन्मानित करण्यात येते. या वर्षीसुद्धा माय मराठी फाऊंडेशन आयोजित 2021मध्ये नऊ जणांना सन्मानित करण्यात आले.
मागील 30 वर्षे शिक्षण अध्यापन क्षेत्रातील सुरेश देशमुख, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सायबर सेलमधील सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ.विशाल माने, रुग्णसेवक कक्षप्रमुख मंगेश चिवटे, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. प्रमोद दाभाडे, रुग्णसेवक निलेश देशमुख, झेप प्रतिष्ठानचे विकास धनावडे, नाट्य सिने अभिनेता प्रशांत निगडे, चित्रकार वैशाली देसाई यांनी आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले आहे.म्हणून त्यांना अजून चांगली प्रेरणा मिळावी यासाठी त्यांच्या घरी जाऊन यथोचित सन्मान करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.