कोल्हापूर ः प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकर्यांच्या प्रश्नावर आत्मक्लेश यात्रा काढली होती, परंतु याच शेतकर्यांनी आता त्यांचा पराभव केला आहे. साखर कारखानदारांशी केलेली अभद्र युती शेतकर्यांना आवडली नाही. ज्यांनी शेतकर्यांची वाट लावली, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे शेतकर्यांना आवडले नाही. तेव्हा शेट्टी यांनी केलेले पाप धुण्यासाठी पंचगंगा डोहात स्नान करून दुसरी आत्मक्लेश यात्रा काढावी. काशीला जाऊन गंगेत स्नान करून तेथे पापक्षालन करावे, अशी बोचरी टीका कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केली.
कोल्हापुरातील शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आल्यानंतर सदाभाऊ खोत बिंदू चौक येथील भाजप कार्यालयात विजयोत्सव साजरा करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला व संजय मंडलिक, धैर्यशील माने यांचा विजय त्यांनी शेतकर्यांना अर्पण केला. शेट्टी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाऊन शेतकर्यांचा विश्वासघात केला. ज्यांनी शेतकर्यांचे वाटोळे केले, त्या पक्षांशी शेट्टी यांनी अभद्र युती केली हे शेतकर्यांना आवडले नाही, पण ते या चोरांच्या टोळीत सामील झाले. शेतकर्यांचा हा अपमान होता, असे सांगत खोत म्हणाले की, शेट्टी यांना व्यक्तिद्वेषाने पछाडले होते. ‘मी’ची बाधा त्यांना झाली होती. शेतकर्यांना माझ्यामुळेच न्याय मिळतोय, मी देवाचा प्रेषित म्हणून जन्माला आलोय, अशी त्यांची एकंदर भावना झाली होती. शेतकर्यांनी पराभव केल्यामुळे त्यांनी आता काशीला जाऊन पापक्षालन करावे. त्यांनी गंगेत स्नान करून तेथेच थांबावे. शेट्टी दुसरी आत्मक्लेश यात्रा कधी काढतात याची मी वाट पाहतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिला, तर आपण वाळव्यातून विधानसभेची निवडणूक लढवू, असेही त्यांनी स्पष्ट केले.