Breaking News

राज्यात पुन्हा निर्बंध?

आरोग्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई : प्रतिनिधी
दिवाळीपूर्वी कमी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसत आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असून, दुसरी लाट येण्याची भीती गडद होत चालली आहे. मागील आठवड्यात राज्यातील रुग्णसंख्येने पाच हजारांच्या सरासरीने उसळी घेतल्याने राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. तसे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी (दि. 23) जालन्यात पत्रकारांशी बोलताना दिले. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुन्हा निर्बंध लावणार असून, मुख्यमंत्र्यांचीही तशी इच्छा असल्याचे टोपे यांनी सांगितले.
आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, बिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढत चालल्याने राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लावणार आहोत. लॉकडाऊन लागू करण्यात येणार नसला तरी शिथील करण्यात आलेले निर्बंध पुन्हा लावण्यात येईल. पुढील दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर घोषणा केली जाईल. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होत नसल्याने कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. या वेळी त्यांनी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने उपनगरी रेल्वेसेवा सर्वांसाठी सुरू करण्याचा राज्य सरकारचा सध्या कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले.
राज्यात दिवाळी खरेदीसाठी व अन्य वेळीही बाजारपेठांमध्ये उसळत असलेली गर्दी, चौपाट्या, समुद्रकिनारे व अन्य पर्यटनस्थळी, सार्वजनिक ठिकाणी होत असलेली गर्दी यामुळे कोरोनाचा प्रसार वाढत आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये कोरोना प्रतिबंधासाठी आणखी उपाययोजना करणे, पर्यटन व सार्वजनिक ठिकाणी कोणतेही नियम न पाळता विनाकारण फिरणार्‍यांना प्रतिबंध करणे, सार्वजनिक ठिकाणी अनिर्बंध किंवा मुक्त वावर नियंत्रित करणे, विवाह व अन्य समारंभांसाठी पुन्हा 200 वरून 50 नागरिकांनाच हजर राहण्याची मुभा देणे, मुखपट्टी न वापरणार्‍यांना दिल्लीच्या धर्तीवर अधिक दंड आकारणी करणे अशा अनेक बाबींवर मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकार्‍यांबरोबरच्या बैठकीत चर्चा होऊन निर्णय होईल, असेही टोपे यांनी सांगितले.
दरम्यान, राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला जातोय. आठ दिवस अंदाज घेऊन काही निर्बंध आणता येतील का याचा विचार सुरू आहे, असे म्हटले आहे. 

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply