Breaking News

पनवेलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागताचा उत्साह

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत समितीच्या वतीने आयोजित शोभायात्रेत लहान मुलांसह महिला, तरुण-तरुणी, जेष्ठ नागरिक, राजकीय मंडळींनी उत्साहाने सहभाग घेतला होता. गेले दोन दिवस पनवेलमध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे शोभायात्रेच्या आनंदावर विरजण पडण्याची भीती होती, मात्र बुधवारी अवकाळी पावसाने माघार घेतल्यामुळे दरवर्षीप्रमाणे पनवेलमधील शोभायात्रा मोठ्या उत्साहात झाली. या शोभायात्रेत भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर हेही सभभागी झाले असून त्यांनी सर्वांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच उत्कृष्ट नियोजनाबद्दल नववर्ष स्वगात समितीचे अभिनंदन केले. या शोभायात्रेची सांगता राम नामाच्या गजराने झाली. हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याकरीता नववर्ष स्वगत समितीच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा पनवेलमध्ये काढण्यात येते. 1998पासून ही परंपरा अविरत सुरू असून यंदाचे हे या शोभायात्रेचे 24वे वर्ष होते. या यात्रेला पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे गायत्रीमंत्राचे पठण करून सुरुवात झाली. त्यानंतर श्री जाखमाता गावदेवी मंदिर, प्रभू आळी, जुने प्रांत ऑफिस, छत्रपती शिवाजी महाराज पथ, श्री वरुपाक्ष महादेव मंदिर, जय भारतनाका, लोकमान्य टिळक पथ असे मार्गक्रमण करत स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात रामनाच्या गजराने या शोभायात्रेची सांगता झाली. या यात्रेत महिला तसेच लहान चिमुकले पारंपरिक वेशभूषा करून मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, तसेच विविध संस्थांच्या वतीने यात्रेदरम्यान सामाजिक विषयांसदर्भात जनजागृती करण्यात आणि तर विविध मंडळांच्यावतीने यात्रेमध्ये आलेल्या नागरिकांना पाणी, सरबताचे वाटप करण्यात आले. यामध्ये पनवेल महिला वकील वर्गाच्यावतीने बाईक रॅली, सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ, इनरव्हील क्लाब ऑफ पनवेल आणि युवानेते केदार भगत व मित्र मंडळाच्या वतीने सरबताचे वाटप, रुधीर सेतूच्या वतीने रक्तदान हेच श्रेष्ठदान या संदर्भात जनजागृती तसेच विविध संस्था आणि मंडळांच्या वतीने पथनाट्य, लाठी-काठीचे सादरीकरण करून लक्ष वेधून घेण्यात आले. या यात्रेदरम्यान पनवेल शहर पोलिस ठाणे आणि वाहतूक शाखेच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या वेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, विक्रांत पाटील, प्रदिप सावंत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष अमित ओझे, उपाध्यक्ष सुनिता खरे, सचिव अविनाश कोळी, माधुरी गोसावी, प्रथमेश सोमण, ज्योती कानिटकर, भाजप सोशल मीडिया सेलचे प्रसाद हनुमंते, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत, पोलीस उपनिरीक्षक महाडीक, वाहतूक शाखेचे अधिकारी, पत्रकार संजय कदम, प्रितम म्हात्रे, गुरुनाथ लोंढे, युवा मोर्चाचे चिन्मय समेळ, पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, देवांशू प्रभाळे, सुमित झुंझारराव, अपूर्व ठाकूर यांच्यासह विविध संस्था, मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक मोठ्या सहभागी झाले होते.

Check Also

खांदा कॉलनीत महिलांसाठी मॅरेथॉन

आमदार प्रशांत ठाकूर यांनी दाखवला हिरवा झेंडा पनवेल ः रामप्रहर वृत्त स्व. संजय दिनकर भोपी …

Leave a Reply