Breaking News

छत्रपती शिवरायांचा अवमान सहन करणार नाही

सकल मराठा समाजातर्फे पनवेल प्रांताधिकार्‍यांना निवेदन

पनवेल : वार्ताहर

तिरुपती बालाजीच्या ठिकाणी छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेली वाहने अडविल्याची व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यापार्श्वभूमीवर सकल मराठा समाजातर्फे छत्रपती शिवरायांचा अवमान सहन करणार नाही, अशी भूमिका मांडत पनवेल प्रांताधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे.

तिरुपती बालाजी याठिकाणी महाराष्ट्रातील अनेक भाविक दर्शनासाठी जातात. त्यापैकी बहुतांशी जण आपल्या स्वतःच्या वाहनाने तिरुपतीला जातात. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा अनेक वाहनांमध्ये असते, परंतु छत्रपतींची प्रतिमा मूर्ती त्याचबरोबर भगवा झेंडा असलेल्या वाहनांना त्याठिकाणी अडवले जाते. पुढे  प्रवेश करून दिला जात नाही. अशाप्रकारे अनेक भाविकांच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात समाज माध्यमांवरसुद्धा काही भाविकांनी वस्तुस्थितीदर्शक व्हिडिओ व्हायरल केले आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा हा एक प्रकारे अवमान आहे. संबंधित देवस्थानला विचारणा करावी. त्याचबरोबर आंध्र प्रदेश राज्य सरकारशी संपर्क साधून या प्रकरणाबाबत माहिती देण्यात यावी. तसेच केंद्र सरकारशी समन्वय साधून महाराजांची प्रतिमा असलेल्या वाहनांची अडवणूक होऊ नये यासंदर्भात उपाययोजना करण्यात याव्यात, अशी न्याय्य मागणी पनवेल चे प्रांताधिकारी राहुल मुंडके यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

या वेळी सकल मराठा समाज, कळंबोली तर्फे समाज बांधव रामदास शेवाळे, प्रकाश चांदीवडे, गणेश लाड, संतोष गायकवाड, किरण नागरगोजे, महादेव क्षीरसागर, सागर मोरे व अवधूत साळुंखे उपस्थित होते.

Check Also

अजितदादांच्या निधनाने कबड्डी खेळाचे मोठे नुकसान -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्तमातीतल्या खेळांपैकी एक कबड्डीचा आधारस्तंभ असलेले अजितदादा पवार यांच्या निधनामुळे या खेळाचे …

Leave a Reply