Breaking News

रायगडातील शाळा, अंगणवाड्या झाल्या पाणीदार

नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे राजिपचे नियोजन

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील शाळा व अंगणवाड्यांची पाणी समस्या निकाली निघाली असून, सर्व अंगणवाड्यांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील तीन हजार 158 शाळांपैकी तीन हजार 140 तर तीन हजार 53 अंगणवाड्यांपैकी तीन हजार 19 अंगणवाड्यांमध्ये नळ कनेक्शन जोडण्यात येऊन नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. उर्वरित शाळा व अंगणवाड्यांना लवकरच नळ कनेक्शन जोडून पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील शाळा, अंगणवाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी नळ कनेक्शन जोडण्याची मोहीम रायगड जिल्हा परिषद प्रशासनाने जलजीवन योजनेंतर्गत हाती घेतली आहे. रायगड जिल्ह्यात तीन हजार 158 शाळा असून, 22 मार्चपर्यंत 99.43 टक्के म्हणजे तीन हजार 140 शाळांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर तीन हजार 53 अंगणवाड्या असून, आत्तापर्यंत 98.89 टक्के म्हणजे तीन हजार 29 अंगणवाड्यांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. उर्वरित 18 शाळा व 34 अंगणवाड्यांना त्वरित नळ कनेक्शन जोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शाळा व अंगणवाडी यांना नळ कनेक्शन जोडण्यासाठी महिला व बालविकास विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक, पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले, शिक्षण अधिकारी पुनिता गुरव, पाणीपुरवठा विभाग कार्यकारी अभियंता सुधीर वेंगुर्लेकर सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.

शाळा व अंगणवाडी इमारतींना नळ कनेक्शन जोडण्याची मोहीम जलाजीवन योजनेंतर्गत हाती घेण्यात आली आहे. सुमारे 99 शाळा व अंगणवाड्यांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे. उर्वरित नळ कनेक्शन देण्याची कार्यवाही सुरू असून, या कामाचा आढावा घेण्यात येत आहे. पुढील काही दिवसात जिल्ह्यातील 100 टक्के शाळा व अंगणवाड्यांना नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येईल.
-डॉ. भरत बास्टेवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी, राजिप

Check Also

दरडग्रस्त माडभुवन आदिवासीवाडीला एमआयडीसीकडून जागेचे हस्तांतरण

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील दरडग्रस्त माडभुवन आदिवासीवाडीच्या पुनर्वसनासाठी आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्न …

Leave a Reply