Breaking News

पत्नी व तिच्या प्रियकरावर पतीने केला प्राणघातक हल्ला

पनवेल : वार्ताहर

कामोठ्यात राहणार्‍या एका विवाहितेने पतीला सोडून विवाहित असलेल्या नितीन शेडगे (28) याच्यासोबत घरोबा केल्याने सदर विवाहितेच्या पतीने व त्याच्या भावाने नितीन शेडगे व विवाहितेवर चाकू व कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना मानसरोवर रेल्वेस्टेशन जवळ घडली. या हल्ल्यात नितीन व त्याची प्रेयसी गंभीर जखमी झाली असून दोघांवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर कामोठे पोलिसांनी विवाहितेच्या पतीसह त्याच्या भावावर कलम 307 नुसार गुन्हा दाखल करून दोघांचा शोध सुरू केला आहे.

या घटनेतील जखमी नितीन शेडगे हा कळंबोलीतील रोडपाली येथे पत्नी व मुलासह राहावयास आहे. आठ महिन्यापूर्वी नितीन मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेला असताना, त्याची ओळख कामोठे गावात राहणार्‍या कविता म्हात्रे (27)हिच्यासोबत झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री होऊन त्यांच्यात प्रेमसंबध निर्माण झाले. ही बाब कविताचा पती कृष्णा म्हात्रे याला समजल्यानंतर त्याने कविताच्या या प्रेमसंबंधाला विरोध केला. त्यामुळे कविता काही महिन्यांपूर्वी आपल्या दोन्ही मुलांना व पतीला सोडून कायमची नितीनकडे राहण्यास गेली. त्यामुळे कविताचा पती कृष्णा म्हात्रे याच्या मनामध्ये कविता व तिचा प्रियकर या दोघांविषयी प्रचंड राग निर्माण झाला होता.

नितीन कवितासह मुंबईला जाण्यासाठी मोटरसायकलवरून मानसरोवर रेल्वे स्टेशनजवळ आला असताना कृष्णा म्हात्रे याने पाठीमागून येऊन त्याच्या बरगडीमध्ये चाकू भोसकला. त्यामुळे नितीन स्वतःला वाचविण्यासाठी पळत जाऊन जुई कामोठे गावात लपून बसला. या वेळी कृष्णा म्हात्रे आणि त्याचा भाऊ पांडुरंग म्हात्रे या दोघांना तिकीट खिडकीजवळ कविता म्हात्रे दिसल्यानंतर त्यांनी तिच्यावर देखील चाकूने व कोयत्याने हल्ला केला. त्यामुळे कविताने दोघांच्या तावडीतून सुटका करून घेत जखमी अवस्थेत रिक्षातून कामोठे येथील ओमसाई रुग्णालय गाठले.

या वेळी जखमी नितीनला त्याच्या पत्नीने एमजीएम रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर कविताला देखील पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेनंतर कामोठे पोलिसांनी कृष्णा म्हात्रे व पांडुरंग म्हात्रे या दोघांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा  दाखल केला आहे. अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती कामोठे पोलिसांनी दिली.

Check Also

सिडकोच्या अभय योजनेस 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

आमदार गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची मागणी व पाठपुरावा आला कामी …

Leave a Reply