परतीच्या प्रवासाचा एसटीवर ताण
अलिबाग : प्रतिनिधी : चौथा शनिवार, रविवार त्यामुळे पर्यटकांची अलिबाग आणि परिसरातील पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी झाली होती. मात्र रविवारपासून (दि 26) मांडवा – गेटवे जलवाहतूक सेवा बंद झाल्याने मुंबईकडे जाण्यासाठी निघालेल्या पर्यटकांचे परतीच्या प्रवासात हाल झाले. त्याचा ताण एसटीवर पडला. जलवाहतूक सेवा बंद झाल्याने मुंबई-ठाण्याकडे जाणार्या प्रवाशांनी अलिबाग एसटी आगारात गर्दी केली होती. तिकीटासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे पहायला मिळत होते.
गेटवे- मांडवा आणि भाऊचा धक्का ते रेवस या दोन जलमार्गाने मुंबईकरांचा प्रवास अलिबागच्या दिशेने होत असतो. खिशाला परवडणारा आणि वेळेची बचत करणारा हा प्रवास ऑक्टोबर, नोव्हेंबर ते मे असा सात ते आठ महिने सुरळीत होत असल्याने मुंबईकर त्या प्रवासाला अधिक प्राधान्य देतात.
गेल्या जवळपास 20वर्षापासून पर्यटकांची अलिबागकडे फिरायला येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी हजारो देशी-विदेशी पर्यटक अलिबाग व परिसरात येत असतात. सध्या मे महिन्याच्या सुट्ट्यांचा हंगाम आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या एरवीपेक्षा अधिक आहे.
पावसाळ्यात रेवस आणि मांडवा ही दोन जलवाहतूकीची बंदरे बंद असतात. यावर्षी 26मेपासूनच जलवाहतूक सेवा बंद करण्यात आली. हवामान खात्याचा अंदाज घेऊन बंदीच्या आदेशानंतरही एक-दोन दिवस प्रवासास परवानगी मिळते; पण यावर्षी ती परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे शनिवारी लॉचने आलेला मुंबईकर रविवारी परतीच्या प्रवासात अडकला. त्याला एसटी शिवाय पर्याय नसल्याने अनेक मुंबईकरांनी एसटीला प्रधान्य दिल्याचे सांगण्यात येते. परिणामी एसटीवर या प्रवासाचा चांगलाच ताण पडला.
अलिबाग-पनवेल मार्गावर जादा गाड्या मुंबईकडे जाणार्या पर्यटकांच्या सोईसाठी अलिबाग-पनवेल मार्गावर रविवारी 12 अतिरिक्त एसटीच्या गाड्या सोडण्यात आल्या. तसेच आगारातील चालक-वाहकांनाही अतिरिक्त सेवा करण्याचे आदेश देण्यात आले.