अमरावती : प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अमरावती जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात वाढल्याने रविवारी (दि. 21) एका दिवसाचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्याला नागरिकांनी प्रतिसाद दिला. अशातच अमरावती व अचलपूरमध्ये पुढील आठवडाभरासाठी लॉकडाऊन करण्यात येत असल्याची घोषणा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. सोमवारी (दि. 22) रात्री 8 वाजल्यापासून हा लॉकडाऊन लागू होेणार आहे. यामधून जीवनावश्यक बाबींना वगळण्यात आले आहे. याशिवाय अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांच्या (अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम) दृष्टीने कोविड-19च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी सुधारित निर्देश लागू करण्यात आले आहेत. याबाबत विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी पाचही जिल्हाधिकार्यांना सविस्तर सूचना दिल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने दुकाने सायंकाळी 5 वाजेपर्यंतच सुरू राहणार असून, विवाह समारंभाकरिता 25 व्यक्तींनाच परवानगी आहे. हे निर्बंध 1 मार्च रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत राहणार आहेत.
पुणे, नाशिकमध्ये रात्रीची संचारबंदी
पुणे, नाशिक : पुण्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने सोमवारी रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याशिवाय 28 फेब्रुवारीपर्यंत शाळा-महाविद्यालये बंद राहणार असून, लग्नसोहळे, सामाजिक-राजकीय कार्यक्रमांवर निर्बंध असणार आहेत, तर नाशिकमध्येही सोमवारपासून रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत संचारबंदी असणार आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. यामध्ये शहरात सोमवारपासून रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री 11 वाजेनंतर विनाकारण फिरणार्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, मात्र या काळात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. शाळा व महाविद्यालये 28 फेब्रुवारीपर्यंत बंदच ठेवण्यात येणार आहेत, तसेच खासगी कोचिंग क्लासेसला दिलेली परवानगी रद्द करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी असलेल्या अभ्यासिका 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. हॉटेल तसेच इतर आस्थापनांना रात्री उशिरापर्यंत दिलेली परवानगी रद्द करण्यात आली असून, हॉटेल आणि बार रात्री 11 वाजता बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लग्न समारंभ, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांवरही पुन्हा निर्बंध आणण्यात आले आहेत. कार्यक्रमास 200 जणांना परवानगी देण्यात आली असून, त्यासाठी पोलिसांची अनुमती घ्यावी लागणार आहे. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना कोरोना नियमांचे पालन करा, असे सांगून आठ दिवसांत स्थिती नियंत्रणात न आल्यास कडक निर्णय घ्यावे लागतील, असे म्हटले.
–यवतमाळमध्ये जमावबंदी लागू
यवतमाळ : कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने यवतमाळमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली असून, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करण्यासाठी 75 संयुक्त पथके नेमण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, त्या परिसराला कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे.