रसायनी : प्रतिनिधी : ईपीएस 95 पेन्शनर्सच्या राज्यस्तरीय बैठकीत प्रलंबित मागण्यांसाठी लढा तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला. या बैठकीला रसायनी पाताळगंगा परिसरातील पेन्शनरांची मोठी संख्या होती. यावेळी राज्यातील लढा तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला. यासाठी राज्यातील नवनिर्वाचित खासदारांच्या घरावर मोर्चे काढून त्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे औद्योगिक पेन्शनर्सचे रायगड जिल्हाध्यक्ष शिवाजी बामणे (रायगड) निवेदन देऊन मागणी मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पेन्शनर्सचा प्रश्न सरकारी दरबारी पडून आहे. मागील पाच वर्षात पेन्शनर्सच्या, कोणत्याही प्रश्नांची दखल न घेण्यात आल्यामुळे पेन्शनरांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले असून राज्यात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. ईपीएस 95 च्या अंतर्गत मिळणारी सर्व पेन्शन तुटपुंजी आहे. त्यामुळे पेन्शनधारकांची स्थिती गंभीर झाली आहे. या प्रश्नासंदर्भात सरकारने भगतसिंग कोशियारी समिती नेमली होती. या समितीने अल्पशी वाढ सुचविली होती, परंतु अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. याकरिता पेन्शनवाढ ताबडतोब लागू करावी, अशी मागणी रायगड औद्योगिक पेन्शनर्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष रसायनी रिस येथील शिवाजी बामणे यांनी केली आहे. या वेळी उदय भट (मुंबई), अतुल दिघे (कोल्हापूर), श्री. जाधव (नांदेड), देवूराज पाटील (अकोला), राजू देसले (नासिक), शिवाजी बामणे (रायगड) उपस्थित होते.