उरण : बातमीदार
दहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसमोर आज अनेक प्रश्न उभे आहेत. त्यात दहावी, बारावीनंतर काय करावे, पुढे कोणती शाखा, क्षेत्र निवडावे, कोणते करिअर करावे, असे अनेक प्रश्न निकाल लागल्यावर पडतात. विद्यार्थ्यांप्रमाणे हाच प्रश्न त्यांच्या आई-वडिलांनाही सतावत असतो. त्या अनुषंगाने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्याच्या मनातील भीती दूर करून, त्यांचे गैरसमज दूर करण्याचा व पुढे कोणते शिक्षण घ्यावे, कोणते करिअर करावे याची माहिती देण्याच्या दृष्टिकोणातून करिअर कॉर्नर उरण या संघटनेच्या माध्यमातून परशुराम रामा पाटील विद्यालय, श्री दत्त मंदिराजवळ, पाणदिवे, कोप्रोलि-पिरकोन रोड येथे शनिवारी (दि. 1) सकाळी 10 ते 1 या वेळेत करिअर गायडन्स या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
करिअर कॉर्नर उरणचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार विठ्ठल ममताबादे यांच्या संकल्पनेतून व आदर्श शिक्षक विद्याधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच सारडे विकास मंचचे नागेंद्र म्हात्रे, आम्ही पिरकोनकर समूहचे चेतन गावंड, आंतरराष्ट्रीय कराटेपटू गोपाळ म्हात्रे, सुयश क्लासेस आवरेचे शिक्षक निवास गावंड यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला असून खारघर (नवी मुंबई) येथील तज्ज्ञ आधार कुलकर्णी, जेएनपीटी टाऊनशीप येथील प्राध्यापक राजेंद्र मढवी हे तज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते राजू मुंबईकर (वेश्वी) हे असणार आहेत. तरी उरणमधील जास्तीत जास्त नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करिअर कॉर्नरच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी करिअर कॉर्नरचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार विठ्ठल ममताबादे 9702751098, विद्याधर पाटील 9969348934 यांच्याशी संपर्क साधावा.