पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत तळोजा फेज-2 येथील सामाजिक कार्यकर्त्या आणि शेकाप महिला आघाडीच्या रायगड जिल्हा उपाध्यक्ष दीक्षा दिलीप जाधव यांनी अनेक महिला व पुरुष कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे शेकापला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा तळोजा फेज 2 येथे झाला. या सोहळ्यास महंत जितेंद्र महाराज, विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, वासुदेव घरत, वसंतराव नाईक, भाजप पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, नंदकुमार म्हात्रे, माजी सरपंच नितीन भोईर, छगन राठोड, उमेश कुंभार, हरेश पवार, अशोक शेडगे, विजय मालवे, सुधीर राठोड, अरुण राठोड, अशोक वीरकर, रूपेश चव्हाण, सुनील गाडेकर यांच्यासह भाजपचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात मान्यवरांनी दीक्षा फाऊंडेशनच्या अध्यक्ष दीक्षा जाधव यांचे भाजपमध्ये स्वागत करत त्यांच्या सामाजिक कार्याचा विशेष उल्लेख केला. जाधव यांनी बोलताना सांगितले की, तळोजा व पनवेल परिसरात होत असलेल्या विकासकामांमुळे प्रेरित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. समाजकारण व विकासाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी भाजपच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे काम करेन.
दीक्षा जाधव व समर्थकांच्या पक्षप्रवेशामुळे तळोजा परिसरात भाजपची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात वाढली असून महापालिका निवडणुकीमध्ये याचा निश्चित सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास उपस्थित भाजप पदाधिकार्यांनी व्यक्त केला.
गतिमान विकास, झपाट्याने वाटचाल -आमदार प्रशांत ठाकूर
या वेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, जगातील सर्वाधिक सदस्यसंख्या असलेला भारतीय जनता पक्ष देशाच्या विकासाचा मजबूत आधारस्तंभ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देश व राज्याने झपाट्याने विकासाची वाटचाल केली आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हे घोषवाक्य केवळ शब्दांत न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरले आहे. विविध लोककल्याणकारी योजना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचविण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडीच्या काळात ज्या विकासापासून जनता वंचित राहिली होती, तो विकास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा गतिमान झाला आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे राज्याने विकासाची नवी उंची गाठली आहे. अशा विकासाभिमुख विचारधारेत सहभागी झाल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. तुम्हाला पक्षात सन्मान आणि काम करण्याची योग्य संधी देण्यात येईल.
Check Also
‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम
दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …
RamPrahar – The Panvel Daily Paper