कळंबोली ः रामप्रहर वृत्त
येत्या 16 जानेवारीला पनवेल महापालिकेवर महायुतीचाच गुलाल उडणार असून विरोधकांचा मागमूसही उरणार नाही, असा घणाघात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी कळंबोली येथे केला. निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीच्या प्रचारासाठी गुरुवारी (दि. 8) जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी पाटील यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेत महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरला.
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय महायुतीच्या प्रभाग क्रमांक 8मधील अधिकृत उमेदवार बबन मुकादम, रामदास शेवाळे, बायजा बारगजे आणि सायली सरक यांच्या प्रचारार्थ कळंबोली येथे भव्य सभा झाली. या सभेला खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, भाजप भटके विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष प्रिया मुकादम, शिवसेनेचे विनोद साबळे, तुकाराम सरक, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेला संबोधित करताना शहाजीबापू पाटील यांनी गुलालाची पोती घेऊन तयार रहा असे म्हणत विजयाची खात्री व्यक्त केली. महायुतीच्या या वादळासमोर विरोधकांचे अस्तित्व संपेल आणि 16 तारखेला मतमोजणीच्या दिवशी केवळ महायुतीचाच विजयोत्सव साजरा होईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या भाषणात, महायुतीने कळंबोली आणि पनवेल परिसराचा कायापालट करण्यासाठी पायाभूत सुविधांचे जाळे विणले आहे. सामान्य नागरिक, महिला आणि ज्येष्ठांसाठी राबवलेल्या विविध योजना थेट त्यांच्यापर्यंत पोहचल्या आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्वांगीण विकास होत असून, येत्या 15 तारखेला मतदान करून महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात शिक्षण संस्थांच्या नावाखाली खासगी कंपन्यांप्रमाणे कारभार करणार्यांवर जोरदार टीका केली. ज्यांनी संकटकाळात जनतेला आधार देण्याऐवजी स्वतःच्या संस्थांचा फायदा पाहिला त्यांना त्यांची जागा दाखवण्याची हीच योग्य वेळ आहे, असे ते म्हणाले. शहाजीबापूंचे पनवेलमध्ये येणे हे नेहमीच विजयाचे शुभसंकेत असते, असेही त्यांनी सांगितले.
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात महायुतीने आपली पूर्ण ताकद झोकून दिली आहे. सभेच्या ठिकाणी झालेली गर्दी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाचे प्रतिबिंब दिसून आले.
Check Also
पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …
RamPrahar – The Panvel Daily Paper