महाड : प्रतिनिधी
लोकशाहीचा चौथा आधार स्थंभ समजल्या जाणार्या पत्रकारांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. मतमोजणी दिनी अलिबाग येथील पत्रकार हर्षद कशाळकर यांच्यावर झालेल्या मारहाणी विरोधात पत्रकारांमध्ये संतापाची भावना आहे. महाड पत्रकार संघाच्या वतीने या हल्लेखोरांना कडक शासन व्हावे आणि पत्रकार संरक्षण कायदा व्हावा, या मागण्या करीत मंगळवारी (दि. 28) महाड उपविभागीय अधिकर्यांना निवेदन सादर करण्यात आले.
अलिबागमधील पत्रकार हर्षद कशाळकर यांना आमदार जयंत पाटील आणि इतरांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आणि पत्रकारांना सातत्याने होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ महाड पत्रकार संघाने महाड प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांना निवेदन दिले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार, उपाध्यक्ष महेश शिंदे, सेक्रेटरी रोहित पाटील, श्रीकांत सहस्त्रबुद्धे, योगेश भामरे, दत्तात्रय कळमकर, दीपक साळुंखे, चंद्रकांत कोकणे आदी उपस्थित होते. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनामध्ये करण्यात आली आहे.