उरण : प्रतिनिधी
नवी मुंबई विमानतळासाठी बाधित होणार्या गावांचे पुनर्वसन करतांना गावातील सर्व वास्तू, सुविधा पुनर्वसन होणार्या ठिकाणी उभारल्या जातील, असे आश्वासन सिडकोच्या वतीने ग्रामस्थांना देण्यात आले. त्यानुसार गावात स्मशानभूमी पासून मंदिरे, समाजमंदिरे आणि सार्वजनिक तलावही बांधून देण्यात येणार आहेत. यासाठी काही भूखंड राखीव ठेवण्यात आले आहेत, मात्र प्रत्यक्षात गावात असलेल्या वास्तूंचा आकार आणि नव्याने उभारल्या जाणार्या वास्तू यात मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचे उलवे येथील बाधित साहित्यिक व कवी गायक पुंडलिक म्हात्रे व येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
विस्थापित होणार्या प्रत्येक गावात मंदिर, समाजमंदिर, स्मशानभूमी, शाळा व तलाव हे कित्येक वर्षांपासून होतेच. त्यानुसार या ग्रामस्थांना उलवे सेक्टरमध्ये स्मशानभूमी, समाजमंदिर व तलावासाठी जागा देण्यात आली. गावातील समाजमंदिरात अनेक सामाजिक उपक्रमांसह लग्न समारंभही होत होते, मात्र नवीन जागेत उभारल्या जाणार्या समाज मंदिराची जागा पाहता येथे कोणते कार्यक्रम करता येतील असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला. तब्बल तीन गावांना मिळून फक्त एक स्मशानभूमी देण्यात आली आहे. त्यामुळे सिडको प्रशासनाने विमानतळ बधितांचे योग्य पुनर्वसन करावे, अशी मागणी उलवे येथील साहित्यिक आणि कवी गायक पुंडलिक म्हात्रे यांनी केली आहे.