उरण : बातमीदार
तालुक्याला पाणीपुरवठा करणारी विहीर म्हणून समजली जाणारी उरण पंचायत समितीच्या विहिरीची अवस्था पाणी असूनही भग्नावस्था झाली आहे. उन्हाचे चटके बसू लागल्याने पाणीटंचाईचा सामना आम जनतेला करावा लागत असतानाही या विहिरीतील पाण्याचा वापर होत नसल्याने आमजनतेत नाराजीचा सूर आहे. तरी जिल्हा परिषदेने उरण पंचायत समितीच्या माध्यमातून या पाण्याचा विनियोग पुन्हा करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
कुलाबा जिल्हा असताना जिल्हा परिषद पंचायत समिती उरणच्या विद्यमाने मरहुमा खानबहाद्दूर होरमसजी भिवंडीवाले पाणीपुरवठा योजना 1966 साली सभापती तु. ह. वाजेकर व गटविकास अधिकारी ना. रा. गुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यान्वित झाली होती. कालांतराने बदल होत रानसई येथे धरण बांधण्यात आल्याने तालुक्यातील गावांना येथून पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला. यामुळे हळूहळू या विहिरीच्या पाण्याचा वापर कमी होत गेला. काही वर्षांपूर्वी ग्रँडवेल कंपनीला पाणी दिले जात होते. आता तर हा वापर आता पूर्णपणे बंद झाला आहे, मात्र आजही विहिरीत पाण्याच्या साठा भरपूर असतानाही त्याचा वापर न होता, तसेच पडून असल्याने तिची भग्नावस्था झाली आहे. यामुळे ती कधीही कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे.
उरण तालुक्याचा औद्योगिक विकास झपाट्याने होत चित्र बदलून गेले. लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे तालुक्याला पाणीपुरवठा करणारे रानसई धरणाचे पाणी कमी पडू लागल्याने इतर ठिकाणावरून पाणी आणूनही मार्च महिन्यापासून पाणीटंचाईचा सामना आमजनतेला करावी लागत आहे, तसेच रानसईसारख्या आदिवासी वाड्यावर धरण असून उशाशी कोरड पडली घशाशी, अशी अवस्था असताना बाहेरून टँकरने पाणी विकत घेऊन सरकारी रकमेचा अपव्यय टाळून उरण मधील आदिवासी बांधवाना येथील विहिरीतील पाणी वापर करावा, अशी मागणी घनश्याम कडू यांनी केली आहे.
अशी परिस्थिती असतानाही या विहिरीच्या पाण्याचा वापर करण्याबाबत जिल्हा परिषद अलिबाग व पंचायत समिती उरण यांच्याकडून या संदर्भात कोणत्याच हालचाली होताना दिसत नाही. उरणचे औद्योगिक कारणामुळे वाढती लोकसंख्या याचा सारासार विचार करून पाणीटंचाईचा सामना करणे कठीण होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने या विहिरीबरोबर द्रोणागिरी डोंगरात व मोरा येथील एकविरा मंदिराजवळ असलेल्या नैसर्गिक पाण्याची उगमस्थाने आहेत. त्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा विनियोग केल्यास उरणकरांना भेडसावणार्या पाणीटंचाईच्या समस्येतून नक्कीच सुटका होईल, असा विश्वासही सामाजिक कार्यकर्ते घन:श्याम कडू यांनी व्यक्त केला आहे.