Breaking News

घुसखोर बांगलादेशी नागरिकास अटक

अमली पदार्थप्रकरणी पनवेल पोलिसांची कारवाई

पनवेल : वार्ताहर

अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या घुसखोर बांगलादेशी नागरिकास पनवेल तालुका पोलिसांनी खारपाडा-आपटा फाटा येथून ताब्यात घेतले असून त्याच्या अटकेमुळे अमली पदार्थाचे विक्री करणार्‍यांचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह, सहआयुक्त डॉ. जय जाधव, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) महेश घुर्ये यांनी नवी मुंबई शहर नशामुक्त करण्याचे व अमली पदार्थ सेवन व विक्री करणार्‍या इसमांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे वेळोवेळी आदेश दिलेले आहेत. त्यानुसार पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना आपटा फाटा-खारपाडा या ठिकाणी एक व्यक्ती अमली पदार्थाची विक्री करणार असल्याबाबत माहिती मिळाली होती. गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून अत्यंत सतर्कतेने, शिताफीने सापळा रचून आरोपी मुसा सुलतान खान (वय 25) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकूण 13 लाख 25 हजार रुपयांचा मेथ एम्फेटामाइन याबा नामक अमली पदार्थाच्या 54.180 ग्रॅम वजनाच्या 530 गोळ्या जप्त करण्यात आल्या. त्याचप्रमाणे त्याच्याकडे बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड, जन्मदाखला मिळून आला आहे.

आरोपी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अनधिकृतरित्या राहत असून प्रवासी कागदपत्रांशिवाय अवैध मार्गाने भारत-बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकार्‍याच्या परवानगीशिवाय घुसखोरी करून भारतात प्रवेश केला तसेच भारतीय नागरिकांना देण्यात येणार्‍या व नमूद वर्णनाच्या बनावट कागदपत्राच्या आधार घेऊन खरी असल्याचे भासवून शासनाची फसवणूक केली.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कलम एनडीपीएस अ‍ॅक्ट 1985चे कलम 8 (क) , 22 (क) सह , भा. दं. वि. कलम 420, 465, 467, 468, 471 सह पारपत्र (भारतात प्रवेश) नियम 1950चे कलम 3 (अ), 6 (अ), परकीय नागरिकांचा कायदा 1946चे कलम 14 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सात दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पनवेल पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply