दिग्दर्शक राज खोसला यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु आहे. जन्म ३१ मे १९२५. आणि मृत्यू ९ जून १९९१. याच त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दक्षिण मुंबईतील कुलाबा येथील रिगल चित्रपटगृहात त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सीआयडी., मेरा गाव मेरा देश अशा काही चित्रपटांच्या खेळाचे आयोजन करण्यात आले असता त्या खेळांना मागील पिढीतील चित्रपट रसिकांप्रमाणेच आजच्या ग्लोबल युगातील झेन जी पिढीतील चित्रपट रसिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काही काही चित्रपट पडद्यावरुन उतरले तरी ते कालबाह्य होत नाहीत. चित्रपट संस्कृतीतील ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे.
असाच एक चित्रपट नवकेतन फिल्म निर्मित आणि राज खोसला दिग्दर्शित ‘काला पानी’ ( मुंबईत प्रदर्शित ९ मे १९५८). एक संगीतमय रहस्यमय चित्रपट. पूर्वीच्या काळात रहस्यमय चित्रपट असो, भयकथा असो, भूतकथा असो, त्यात गीत संगीत एक मोठीच जमेची बाजू असे. त्या काळातील दिग्दर्शक त्याबाबत विशेष जागरूक असत.
देव आनंदच्या वाटचालीत दिग्दर्शक चेतन आनंद, राज खोसला आणि विजय आनंद यांचा अतिशय महत्त्वाचा फंडा. विजय आनंदच्या दिग्दर्शनातील देव आनंद म्हणताक्षणीच चित्रपट रसिकांच्या किमान तीन पिढ्यांच्या डोळ्यासमोर नौ दो ग्यारह (१९५७)पासूनचे या जोडीचे अनेक चित्रपट येताना देव आनंदचं रूपडं, स्टाईल, इमेज, लोकप्रियता इतकेच नव्हे तर त्याच्या अभिनयातील मर्यादा हे सगळेच विचारात घेऊन विजय आनंदने त्याला तेरे घर के सामने, ज्वेल थीफ, जॉनी मेरा भारत, तेरे मेरे सपने, छुपा रुस्तम इत्यादीत कसा रुपेरी पडद्यावर साकारला आणि ‘गाईड’मध्ये त्याच्यातील अभिनय क्षमताही दाखवली हे आले असेल. त्या काळातील अनेक चित्रपट रसिकांच्या एका पिढीतून पुढील पिढीत जात राहिले. चित्रपट अभ्यासात या गोष्टीची विशेष नोंद व्हायला हवी.
राज खोसलाच्या दिग्दर्शनातील देव आनंद हाही बहुरंगी प्रवास. अगदी ‘मिलाप’ (१९५५) पासूनचा. म्हणजे कृष्ण धवल अर्थात ब्लँक ॲण्ड व्हाईट चित्रपटाच्या काळापासूनचा!
याच जोडीचा रहस्यरंजक चित्रपट ‘काला पानी’च्या प्रदर्शनास ६८ वर्ष झालीदेखील. आजही त्याच्या लोकप्रिय गाण्यांची खुमारी कायम आहे. रेडिओ ते डिजिटल युग असा या गाण्यांचा प्रवास सुरू आहे.
चित्रपटाची निर्मिती नवकेतन फिल्म बॅनरखाली झालेली. सुरुवातीच्या काळात नवकेतन फिल्मचे कार्यालय असलेला महालक्ष्मी येथील फेमस स्टुडिओ अलिकडेच पाडण्यात आला आणि जुन्या मुंबईतील एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट काळाच्या पडद्याआड गेली.
‘काला पानी’च्या कथाआशयात नायक करण मेहरा ( देव आनंद) आपले तुरुंगात शिक्षा भोगत असलेले वडील कसे निरपराध ( निर्दोष ) आहेत याचा शोध घेतो असे मध्यवर्ती सूत्र आहे. करणला त्याची आई सांगते की त्याच्या लहानपणीच त्याच्या वडीलांचे निधन झाले, पण अमरला हे खरे वाटत नसते. तो या प्रकरणाचा शोध घ्यायचे ठरवतो आणि आपल्या पित्याच्या बाजूने साक्ष देणाऱ्यांचा शोध घेतो. त्यात त्याला पोलीस इन्स्पेक्टर मेहता भेटतो आणि या एकूणच प्रकरणाबाबत एका डायरीतून बरीच माहिती मिळेल असे सांगतो. त्या डायरीचा शोध यावर रहस्यरंजकता खुलते. अमरची आशा (मधुबाला) हिच्याशी ओळख आणि मग प्रेम प्रकरण घडते. ती पत्रकार असते आणि ती अमरला बरीच मदत करते. चित्रपटाच्या अखेरीस सत्य बाहेर येते आणि अमरचे वडील जेलबाहेर येतात. त्या काळात अशा रहस्यमय गोष्टींचे चित्रपट रसिकांना विशेष आकर्षण असे.
‘काला पानी’च्या अनुभवाबद्दल नलिनी जयवंतनी एका मुलाखतीत म्हटलं होतं, या चित्रपटाचे शूटिंग देव आनंदने अतिशय झपाट्याने सुरू केले. गोरेगावच्या फिल्मीस्थान स्टुडिओत रात्रंदिवस अठ्ठावीस दिवस काम करीत त्याने बराचसा चित्रपट पूर्ण केला. राज खोसलांचे पेपरवर्कही उत्तम होते. देव आनंदच्या अथक काम करण्याच्या पद्धतीकडे पाहून नलिनी जयवंतही आश्चर्यचकित झाल्या. याच चित्रीकरणात नलिनी जयवंत यांच्यावरील बरीच दृश्य चित्रीत झाली. देव आनंदच्या शिस्तबद्ध काम करण्याच्या पध्दतीमुळे नलिनी जयवंतना बरीच मेहनत करावी लागली तरी चित्रपटाच्या रशेस पाहिल्यावर आपल्या मेहनतीचे चीज झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या चित्रपटाच्या चित्रीकरण काळातच राज खोसला यांच्या मुलाचे निधन झाल्यावर आता काय करायचे असा प्रश्न निर्माण होताच देव आनंदने विजय आनंदकडे काही काळ जबाबदारी सोपवली. चित्रपटात किशोर साहू, प्रवीण पॉल, आगा, मुकरी, नासिर हुसेन, कृष्ण धवन, जानकीदास, मुमताज बेगम, हीरा सावंत यांच्याही भूमिका.
दिग्दर्शक राज खोसलांच्या चित्रपटातील गीत संगीत ही एक छान जमून येणारी गोष्ट. दृश्य माध्यमावर पकड असलेला दिग्दर्शक ही त्यांची ओळख.
पटकथेत त्या गाण्यांना योग्य स्थान (गाण्यांसह चित्रपट पुढे सरकणे), गाणी ऐकावयास श्रवणीय आणि पडद्यावर पाह्यलाही आकर्षक. म्हणून तर त्यांच्या दिग्दर्शनातील चित्रपटातील अनेक गाजलेली अनेक गाणी आजही लोकप्रिय आहेत.
‘काला पानी’ची गाणी मजरुह सुल्तानपुरी यांची तर संगीत सचिन देव बर्मन यांचे. ‘अच्छा जी मे हारी चलो मान जाओना’ गाण्यातील देव आनंद व मधुबाला यांच्यातील छेडछाड, खट्याळपणा रंगतदार. आशा भोसले आणि मोहम्मद रफी काय भन्नाट गायलेत.
‘दिलवाले अब तेरी गली तक’ गाण्यातील दोघांचे वेषांतर आणि नृत्यही लाजवाब. जब नाम मोहब्बत ले के (आशा भोसले), दिल लगाके कदर गयी प्यारे (आशा भोसले), हम बेखुदी मे तुमको पुकारे चले गये (मोहम्मद रफी) ही या चित्रपटातील आणखी काही गाणी. कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांचा रंग काही वेगळाच असे आणि त्याचा दिग्दर्शक व छायाचित्रणकार खुबीने वापर करीत. चित्रपट निर्मितीत प्रेक्षक जास्त डोळ्यासमोर असे. निर्मितीचा खर्च आणि फायद्याचे गणित कुठेही नसे.
हा चित्रपट ए.जे. क्रोनिन यांच्या ‘बीयॉण्ड दीस प्लेस’ या चित्रपटावर आधारित होता. त्याचे भारतीयकरण आनंद पॉल यांनी केले. ग.रा. कामत यांनी पटकथा लिहिली. त्यांची राज खोसला यांच्याशी छान जोडी जमली होती. (जोडीने मेरा साया, दो रास्ते, मेरा गाव मेरा देश असे अनेक चित्रपट दिले.), तर संवाद भप्पी सोनी यांचे होते. कालांतराने ते दिग्दर्शक म्हणून कार्यरत झाले. एखादा दिग्दर्शक असा घडत घडत जातो.
राज खोसला आणि देव आनंद पंजाबमधील गुरदासपुरचे. अर्थात बालपणीचे मित्र. दोघांचा मुंबईतील आणि चित्रपटसृष्टीतील प्रवास खूपच मोठा आणि वळणावळणाचा. त्यात संघर्ष आणि काही अडथळेही आले.
देव आनंदनेच त्याला ‘बाझी’च्या वेळेस गुरुदत्तकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून संधी दिली. (आणि त्याचं गायक बनण्याचे स्वप्न मागे पडले. त्याने गायनात के.एल. सैगलचा आदर्श ठेवला होता. थोडीफार गायची संधीही मिळाली.) ‘बाजी’नंतर ‘जाल’ व ‘बाज’ या चित्रपटांसाठी राज खोसला गुरूदत्तचा सहाय्यक दिग्दर्शक होता. निर्माता फतेहचंद बारीक यांनी त्याला ‘मिलाप’पासून स्वतंत्रपणे चित्रपट दिग्दर्शनाची संधी दिली. पहिल्याच दिग्दर्शनातील चित्रपटात अर्थात देव आनंद होताच, जोडीला गीताबाली. ‘काला पानी’ हा राज खोसला व देव आनंद जोडीचा ‘सीआयडी.’ व ‘सोलवाह साल’नंतरचा चित्रपट. त्यानंतर ही जोडी ‘बम्बई का बाबू’ आणि त्यानंतर खूप वर्षांनी ‘शरीफ बदमाश’साठी एकत्र आली.
दरम्यान, राज खोसलांनी आपल्या दिग्दर्शनातील चित्रपटातील थीममधील केवढी तरी विविधता वाढवली. ‘काला पानी’, ‘मेरा साया’ रहस्यरंजक होते, तर ‘मेरा गाव मेरा देश’ डाकूपट, ‘वह कौन थी’, ‘अनिता’ रहस्यपट, तर ‘दो रास्ते’, ‘मैं तुलसी तेरे आंगन की’ सामाजिक. खरंतर राज खोसलाच्या चित्रपटांवर वेगळा फोकस हवा. त्याच्या ‘नकाब’च्या निमित्ताने खारच्या त्याच्या निवासस्थानी अतिशय सविस्तर मुलाखतीचा योग आला असता त्यानी फ्लॅशबॅकमध्ये जात अनेक गोष्टी सांगितल्या. त्यातील एक म्हणजे, देव आनंद त्याचा बालमित्र होता तरी ‘शरीफ बदमाश’च्या वेळेस त्यांचे पटकथाकार के.ए. नारायण यांच्यासंदर्भात काही बिनसले. नारायण यांच्या पटकथेनुसार आपल्याला जाता येत नाही असं राज खोसलाचं म्हणणं होतं. विजय आनंद दिग्दर्शित ‘ज्वेल थीफ’ (१९६७) आणि ‘जॉनी मेरा नाम’ ( १९७०)च्या यशापासून के.ए. नारायण ‘स्टार’ पटकथाकार म्हणून ओळखले जात. राज खोसला यांनी या सगळ्यात ‘शरीफ बदमाश’कडे काहीसं दुर्लक्ष केले आणि ‘कच्चे धागे’वर सगळे लक्ष केंद्रित केले. त्यात राज खोसलांचा आवडता व्हीके (अर्थात विनोद खन्ना) होता. देव आनंदने आपल्या खेळकर शैलीत राज खोसलाची समजून काढायची ठरवले व तो चक्क ‘कच्चे धागे’च्या सेटवर गेला. त्यात तो यशस्वी ठरला. राज खोसलाने आपल्याला हवे तसे ‘शरीफ बदमाश’मध्ये बदल केले. यात सगळाच रंग उडाला आणि त्यात हा क्राईम थ्रीलर रंगला नाही. याचा परिणाम अर्थात पिक्चर फ्लॉप होण्यात झाला. हे दोन्ही चित्रपट १९७३ साली प्रदर्शित झाले.
‘काला पानी’च्या प्रदर्शनास ६८ वर्ष पूर्ण होत असतानाच राज खोसला व देव आनंद जोडीवर हा एक फोकस. चित्रपट रसिकांच्या किमान तीन पिढ्या एव्हाना जुन्या आठवणीत गेले असतीलच, एका पिढीला आपण हा चित्रपट मॅटीनी शोला पाहिल्याचे आठवेल तर आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीने यू ट्यूबवर हा रहस्यरंजक चित्रपट एन्जॉय करायचे ठरवलेही असेल. जुन्या काळातील चित्रपटांची दखल ही अशी अनेक पिढ्यांना जोडते… देव आनंदच्या चाहत्यांना असे जुने चित्रपट सुखावतात. त्यांना तो देव आनंद जास्त आवडतो.
- दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)
RamPrahar – The Panvel Daily Paper