Breaking News

20 जूनपर्यंत अर्ज करावेत

सागरी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी

‘सागरी मत्स्य व्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन’ या 6 महिन्याच्या प्रशिक्षण वर्गासाठी मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्राकडे दि. 20 जूनपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

मत्स्यव्यवसायाचा विकास व विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून मत्स्य व्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थीना ‘सागरी मत्स्य व्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन’ या 6 महिन्याचे प्रशिक्षण वर्सोवा येथील मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रामध्ये देण्यात येते. 2019-2020 या वर्षातील प्रशिक्षण वर्गाचे आयोजन दिनांक 1 जुलै ते 31 डिसेंबर 2019 या 6 महिन्याच्या कालावधीत करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी प्रत्येक माहिन्यासाठी 450 रुपये तर दारिद्रयरेषेखालील प्रशिक्षणार्थीला दरमहा 100 रुपये इतके  प्रशिक्षण शुल्क आकारले जाते.

प्रशिक्षणार्थी निवडीचे निकष याप्रमाणे आहेत. प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छीमार व प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थीचे वय 18 ते 35 या दरम्यान असावे. पोहता येणे आवश्यक आहे. किमान 4 थी इयत्ता उतीर्ण असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थीस मासेमारीचा किमान 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. बायोमेट्रिक कार्ड धारक किंवा आधार कार्डधारक असावा. संबंधित संस्थेच्या शिफारसीसह विहित परिपूर्ण अर्ज असावा. प्रशिक्षणार्थी दारिद्रय रेषेखालील असल्यास अर्जासोबत त्याबाबतचे प्रमाणपत्र, संबंधित गट विकास अधिकार्‍याच्या दाखल्याची साक्षाकींत प्रत जोडणे आवश्यक आहे.

निकषांची पूर्तता करणार्‍या इच्छुक  मच्छीमारांनी मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा, मुंबई-61 येथे दिनांक 20 जून 2019 पर्यंत करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply