Breaking News

उरण विधानसभा मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते भाजपत

बोलतोय ते करून दाखवणार : महेश बालदी

रसायनी : रामप्रहर वृत्त

मी कधीही जात-धर्म मानला नाही. माणूस हाच एक धर्म आहे. ज्यांना विकास कळत नाही ते जातीचे राजकारण करतात. 21व्या शतकात आपण चंद्रावर पोहोचलो, पण विरोधक जातीच्या नावाने राजकारण करीत आहेत. उरण मतदारसंघात विकास खुंटला असून, विकासाला दिशा देण्यासाठी मी निवडणूक लढवतोय आणि यापुढेही विकास करीत राहणार. जे बोलतोय ते मी करून दाखवणार, असे रोखठोक प्रतिपादन जेएनपीटीचे विश्वस्त व भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी मोहोपाडा येथे केले.

उरण विधानसभा मतदारसंघातील शेकाप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांतील हजारो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सिडको अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. 29) सायंकाळी मोहोपाडा येथील जनता विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या सोहळ्यात भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. विविध पक्षांतील सक्रिय कार्यकर्ते दिवसेंदिवस भाजपमध्ये दाखल होत असून, उरण विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र आहे. 

या सोहळ्यास भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, खालापूर तालुकाध्यक्ष बापू घारे, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, ज्येष्ठ नेते भीमसेन माळी, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण पवार, पनवेल-उरण विस्तारक अविनाश कोळी, संतोष मंजुळे, गुळसुंदे ग्रामपंचायतीचे सरपंच हरिश्चंद्र बांडे, कसळखंड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अनिल पाटील, साई ग्रामपंचायतीचे सरपंच विद्याधर मोकल, माजी सरपंच किरण माळी, लक्ष्मण पारंगे, विजय मिरकुटे, अविनाश गाताडे, मनोज पवार, यशवंत जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी युवकांची उपस्थिती लक्षणीय होती, तर महिलाही आवर्जून हजर होत्या.

निवडणुकीच्या धामधुमीत भाजपला तळागाळातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. अशाच प्रकारे उरण मतदारसंघातील तुराडे ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकांत भोईर, उपसरपंच हरेश पाठारे, गुळसुंदे ग्रामपंचायतीचे उपसरपंच शांताराम मालुसरे, सदस्य उपासना चंद्रहास गोठळ, अनिता वाघमारे, गजानन मालुसरे, रमेश मालुसरे, लाडिवली येथील माजी सदस्य वसंत गोळे, खालापूर पंचायत समिती सदस्य वृषाली पाटील यांचे पती ज्ञानेश्वर पाटील, चौक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बाळू पवार, लोहोप येथील उपसरपंच अनंता पाटील, सदस्य भरत पाटील, चिरनेर येथील पराग भास्कर ठाकूर, वासांबे (मोहोपाडा) ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सचिन तांडेल, चांभार्लीचे माजी उपसरपंच कमलाकर पाटील, कुंडलिक जांभळे, देवळोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच यादव दिघे, सदस्या शर्मिला पाटील, पोयंजे ग्रामपंचायतीचे सदस्य मंदार चोरघे, प्रताप चोरघे, इसांबे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य भरत हिलम, वडगाव ग्रामपंचायतीच्या सदस्य नीता संदीप पाटील, सदस्य राजेश पाटील, योगिता भोईर, गुळसुंदे येथील संतोष चौलकर, संतोष साठे, प्रकाश मुरकुटे, सतीश साठे, योगेश साठे, चिंतामण गायकवाड, आप्पा वाडकर, सचिन कोळंबेकर, वाळकू म्हामणकर, नारायण जाधव, आष्टे, कसळखंड, केळवणे, खाने आंबिवली, सोमाटणे, रिस, साई, पानशील, देवळोली, कांबे, चौक, मोहोपाडा, माजगाव आंबिवली, वावेघर, वयाळ, नवीन पोसरी, कराडे बुद्रुक, तीनघर वाडी येथील शेकाप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांतील एक हजारांहून अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप नेते महेश बालदी यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले.

या वेळी आमदार प्रशांत ठाकूर आपल्या भाषणात म्हणाले की, उरण मतदारसंघात शिवसेनेचे आमदार असताना एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते भाजपमध्ये का येत आहेत? याचे कारण म्हणजे महेश बालदी यांनी मतदारसंघात विकास केला आहे आणि प्रश्नही सोडविले आहेत. भारतीय जनता पक्ष विकास करीत आहे. आपण महेश बालदी यांच्या माध्यमातून येथील विकास करून घेणार आहोत. लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारा नेता आता या मतदारसंघाला मिळाला आहे. विकासकामे करण्याची धमक बालदी यांच्यात आहे. म्हणून त्यांना निवडून द्या, असे आवाहनही आमदार ठाकूर यांनी केले.

गेल्या सहा ते सात महिन्यांत असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. येत्या निवडणुकीत मला एक लाख मते मिळणार, असा विश्वास महेश बालदी यांनी व्यक्त केला. या वेळी शिवसेनेचे विद्यमान आमदार मनोहर भोईर यांच्यावर निशाणा साधत विकास न करता त्यांनी भकास परिस्थिती करून ठेवली आहे. ती सुधारण्यासाठी आणि उरण विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे. पनवेलमध्ये विकास होतो; मग उरण मतदारसंघाचा विकास का होत नाही, असा सवाल बालदी यांनी केला. ते पुढे म्हणाले, विश्वातील पहिले शिवसमर्थ स्मारक उभारण्याचे भाग्य व आशीर्वाद मला मिळाले. एचओसी कंपनीच्या कामगारांना न्याय मिळवून देण्याचे काम करायचे आहे. मोहोपाडा नगर परिषद करणार, मेट्रो रसायनीला का येऊ शकत नाही, ती आणणार, सुसज्ज रुग्णालय उभारणार, पाण्याचा प्रश्न सोडविणार, येणारे सरकार भाजपचे असणार आहे. उरण मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आपण मला निवडणुकीत निवडून देणार, असा मला विश्वास आहे. मित्रांनो, मी काय जादूचा पेटारा उघडलेला नाही, पण मी जे बोलतो ते करून दाखवतो. बालदी यांनी विवेक पाटील यांच्यावर निशाणा साधत कर्नाळा बँकेमध्ये चालू असलेल्या अनागोंदी कारभारावर निशाणा साधला. मागील निवडणुकीत जी झाली त्याहूनही अधिक खराब परिस्थिती विरोधकांची होणार हे मी छातीठोकपणे सांगतो. मी मारवाडी असून जेवढी चांगली मराठी बोलतो, तेवढी मनोहर भोईरांना येत नाही, असा टोला लगावतानाच आपण जिंकणारच आणि येत्या 24 तारखेला गुलाल उधळायला उरणला यायचे आहे, असे आमंत्रण महेश बालदी यांनी उपस्थितांना दिले.  या सोहळ्याचे प्रास्ताविक विस्तारक अविनाश कोळी यांनी केले. त्यांनी महेश बालदी यांनी केलेल्या कार्याचा आढावा प्रास्ताविकातून सादर केला. पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळवून हॅट्ट्रिक करणार आहेत, तर उरणमध्ये महेश बालदी एक लाख मतांचा आकडा पार करून आमदार होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply