Breaking News

नामांतरावर शिक्कामोर्तब

मुंबई ः प्रतिनिधी

औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास शनिवारी (दि. 16) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे नामकरण करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे धाराशिव नामकरण करण्याबाबतच्या प्रस्ताव मंजुरीचे 29 जून रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीचे कार्यवृत्त मान्यतेसाठी नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळासमोर आणण्यात आले होते. त्यावर हे दोन्ही प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी फेरसादर करावेत, असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार हे प्रस्ताव शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत फेरसादर करण्यात आले. या दोन्ही प्रस्तावांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली. संबंधित प्रस्ताव केंद्र शासनास पाठविण्यात येऊन त्यानंतर विभाग, जिल्हा, तालुका तसेच महापालिका व नगरपालिका यांचे नामांतर करण्यात येईल. याबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभागाकडून अधिनियमांप्रमाणे करण्यात येणार आहे. याचबरोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे नामकरण करण्याबाबत प्रस्तावाच्या मंजुरीचे मंत्रिमंडळ बैठकीचे कार्यवृत्त मान्यतेसाठी नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळासमोर आणण्यात आले होते. त्यावर हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी फेरसादर करावेत असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार हा प्रस्ताव शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत फेरसादर करण्यात आला व त्यालाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार 12.5% योजनेच्या अंमलबजावणीसाठी लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे योगदान आहे. तद्नंतर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी संपादित जमिनीसाठी मोबदला ठरवावयाच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेले 22.5% योजनेचे धोरणसुद्धा 12.5% धोरणाच्या धर्तीवर तयार करण्यात आले आहे.सिडको महामंडळाच्या माध्यमातून पनवेल तालुक्यात 1160 हेक्टर क्षेत्रावर सार्वजनिक खाजगी भागीदारीतून नवी मुंबई ग्रीनफील्ड विमानतळ विकसित करण्यात येत आहे. या संपूर्ण 1160 हे. जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून विमानतळ प्रकल्पाची भूविकास कामे प्रगतिपथावर आहेत. या विमानतळाच्या नामकरणाच्या अनुषंगाने लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती, इतर संघटनांकडून मागणी करण्यात येत होती. नवी मुंबई परिसरातील विकासामध्ये असलेले लोकनेते दि. बा. पाटील यांचे योगदान आणि स्थानिकांच्या संघटनांची मागणी विचारात घेता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे करण्यास शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या सर्व निर्णयांबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले जात आहेत.

‘दिबां’च्या कार्याचा गौरव -आमदार प्रशांत ठाकूर

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील विमानतळ नामकरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आणि लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘पनवेल तालुक्यात होणार्‍या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्याचा ठराव राज्य मंत्रिमंडळाने आज केला. त्याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. दि. बा. पाटीलसाहेब हे भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त या सर्वांसाठी लढले आणि त्यांचे नेतृत्व करीत त्यांच्या जीवनाला ‘दिबां’नी नवी दिशा दिली. ‘दिबां’च्या या कार्याचा गौरव करीत आज महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे. लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाने आम्ही जी संघर्ष समिती स्थापन केली त्याला गेल्या संपूर्ण वर्षभरात ठाणे, रायगड, पालघर, मुंबई या सर्व जिल्ह्यांतील भूमिपुत्रांनी प्रचंड साथ दिली. त्या सगळ्यांच्या मागणीचा रेटा तयार झाला आणि त्यानंतर राज्य सरकारने आज निर्णय घेतला. त्याबद्दल मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो. लवकरात लवकर या ठरावाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आपण सारे पाठपुरावा करीत राहू,’ असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले आहे.

सर्वपक्षीय कृती समितीने मानले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार

पनवेल ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने शनिवारी  मंत्रिमंडळ बैठकीत घेऊन लाखो भूमिपुत्रांचा सन्मान केला. त्याबद्दल लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त केले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन सरकारने 29 जूनला ते सरकार अल्पमतात असताना घाईघाईने काही निर्णय घेतले होते. यात नामांतराचेही निर्णय होते, मात्र या निर्णयांबाबत पुढे जाऊन काही कायदेशीर अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून हे प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी फेरसादर करावेत असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार ते शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत फेरसादर करण्यात आले व त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत शेतकरी, भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांचा सन्मान केला. त्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. विमानतळ नामकरणाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकार्‍यांनी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. या वेळी समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, पनवेलचे माजी उपमहापौर जगदिश गायकवाड, गुलाब वझे, जे. डी. तांडेल, राजेश गायकर, दीपक म्हात्रे, विनोद म्हात्रे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

ऐतिहासिक निर्णय -लोकनेते रामशेठ ठाकूर

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा अतिशय चांगला आणि ऐतिहासिक निर्णय आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. सर्व प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टिने अतिशय महत्त्वाचा व आनंदाचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे, असे या वेळी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले. लोकनेते रामशेठ ठाकूर पुढे म्हणाले की, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर जिल्ह्यांतून भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, सर्व जाती-धर्मांच्या लोकांनी, सर्वपक्षीयांनी दि. बा. पाटीलसाहेबांचे नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे असा आग्रह धरला होता. शेतकर्‍यांचे लढवय्ये नेते, दोन वेळा खासदार, पाच वेळा आमदार आणि विरोधी पक्षनेते म्हणूनही ‘दिबा’साहेबांनी महाराष्ट्रात जे काम केले त्याला तोड नाही. त्यांनी आमच्यामध्ये ऊर्जा, स्वाभिमान, अस्मिता जागृत केली. त्यामुळे त्यांचे नाव त्यांच्या भूमीत होणार्‍या विमानतळाला द्यावे अशी सर्वांची इच्छा होती आणि त्या दृष्टीने आम्ही गेले वर्ष-दीड वर्ष संघर्ष करीत होतो. त्यांचे नाव देण्याकरिता 2008पासूनची मागणी होती. आज ते आमचे स्वप्न पूर्ण होतंय. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आम्ही आभार मानतो.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply