रसायनी : प्रतिनिधी : भिलवले या भागात गेल्या दोन महिन्यांत, शेतकरी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 20 जनावरे चोरीला गेल्याने येथील शेतकरी चिंतातूर झाला असून शेतीचा हंगाम जवळ आल्याने नांगरणीचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
वावंढळ येथील शेतकरी प्रकाश सखारामराव कदम यांचा एक बैल एप्रिलमध्ये चोरीला गेला, काही दिवसांनी दुसराही बैल चोरीला गेला. याबाबत त्यांनी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.हळूहळू नऊ जनावरे गायब झाली. या परिसरातील तीव्र पाणीटंचाई व माळरानावर आग लावण्याच्या प्रकाराने जनावरांचा चारा नष्ट होत असल्याने जनावरे चारा व पाण्यासाठी वणवण फिरत असतात, त्याचाच फायदा घेऊन जनावरांच्या चोरीच्या प्रमाणात वाढ होत आहे. या परिसरात धनिकांच्या जागा वाढल्या असून नदीकडेला अनेक फार्महाऊस आहेत, त्यांचे कुंपण असल्याने जनावरे नदीवर पाण्यासाठी जाऊ शकत नाही.
येथील शेतकरी बारमाही शेतकरी व सधन नसल्याने तो आपली जनावरे गोठ्यात बांधून ठेवू शकत नाही. पावसाळ्यात फक्त नांगरणीसाठी बैलांचा उपयोग होतो, बैल चोरीबरोबर गाई व लहान वासरे यांचेही चोरीचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वी कर्जत येथे जनावरे भरलेली गाडी पोलिसांनी पकडली आहे. काही महिन्यांपूर्वी भिलवले, वावरले या ठिकाणी जनावरे कापून त्यांच्या मांसाची चोरीही झाली होती. वावंढळ येथील लक्ष्मण पवार यांचा बैलगाडीचा बैल चोरीला गेला होता, नऊ दिवस शोधून तो सापडेना, मात्र तो भिलवले ठाकूरवाडीत बांधून ठेवल्याचे समजल्यावर व तिथे गेल्यावर तो ताब्यात घेण्यात यश आले. या चोरीमागे स्थानिक गुन्हेगार यांचा हात असावा, असा संशय आहे.