Friday , March 24 2023
Breaking News

इंग्लंडचा विंडीजवर जबरदस्त विजय

ब्रीजटाऊन : वृत्तसंस्था

वेस्ट इंडिजच्या ख्रिल गेलची 135 धावांची शतकी खेळी आणि संघाने 360 असा धावांचा डोंगर उभारूनही त्यांना सामना वाचवता आला नाही. इंग्लंडने हा सामना आठ चेंडू शिल्लक असतानाच आरामात जिंकून एकदिवसीय मालिकेत विजयी सलामी दिली.

इंग्लंडच्या विजयाचे श्रेय जसे शतकवीर जेसन रॉय व जो रुट यांना दिले गेले, तसे विंडीजच्या पराभवाचे खापर त्यांचे गचाळ क्षेत्ररक्षण आणि ख्रिस गेलने खेळून काढलेल्या तब्बल 61 निर्धाव चेंडूंवर (डॉट बॉल) फोडले गेले. गेलसारखा आक्रमक खेळाडू, ज्याने याच खेळीत 12 षटकार लगावले तो तब्बल 10 षटके निर्धाव खेळून काढतो. साहजिकच याचा परिणाम वेस्ट इंडिजच्या धावगतीवर आणि धावसंख्येवरही झाला; अन्यथा त्यांनी कदाचित 400 धावासुद्धा उभारल्या असत्या. गेल्या जुलैपासून पहिलाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळणार्‍या गेलची सुरुवातच अतिशय संथ झाली. पहिल्या 32 चेंडूंत त्याने फक्त 9 धावा केल्या. त्यातही त्याला एक जीवदान लाभले. त्याने अर्धशतक पूर्ण करण्यासाठी तब्बल 76 चेंडू घेतले आणि शतक बरोबर 100 चेंडूंत साजरे केले. याच्या तुलनेत इंग्लंडच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले जेसन रॉय व जो रुट या दोघांनीही गेलपेक्षा जलद शतक व अर्धशतक साजरे केले. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी गेलएवढे षटकारसुद्धा मारले नाही. म्हणजे त्यांनी एकमेकांना फलंदाजीची संधी देत धावफलक सतत हलता ठेवला आणि इंग्लंडची धावगती सतत आवश्यकतेपेक्षा अधिक ठेवत विजयात मोलाचा वाटा उचलला.

Check Also

पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply