पनवेल : रामप्रहर वृत्त
निसर्ग मित्र, पनवेल या संस्थतर्फे बुधवारी (दि. 5) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सकाळी 6.30 वाजता चिपळे पूल येथे गाढी नदीच्या साफसफाईची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी चिपळे पूल येथे उपस्थित राहावे, असे आवाहन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.
गेली 32 वर्ष निसर्ग मित्र ही संस्था निसर्ग शिक्षण, निसर्ग संवर्धन, गिर्यारोहण अशा अनेक पातळ्यांवर निसर्गाच्या संवर्धनाचे काम करत आहे. पनवेलमधील गाढी नदीला वाचवण्याचा प्रयत्न ही संस्था या वेळी करत आहे. हे काम फक्त निसर्ग मित्र संस्थेचे नसून आपल्या सर्वांचे आहे. जर आपण आपल्या नद्या व निसर्ग वाचवू शकलो नाही, तर उद्या त्याच नद्यांचे गटार झालेले असेल. आपण सर्वांनी निसर्गाचे रक्षण करण्याच्या या प्रयत्नात सहभागी व्हावे. त्यामुळे आपले आजचे प्रयत्न उद्याच्या पिढीला नक्कीच लाभदायक ठरतील, असेही आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.