Breaking News

अटल करंडक स्पर्धेचा शानदार शुभारंभ

सिने-नाट्य कलाकारांची प्रमुख उपस्थिती; रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेलमध्ये होत असलेल्या सातव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचा शुक्रवारी (दि. 29) सिने-नाट्य कलाकारांच्या प्रमुख उपस्थितीत शानदार शुभारंभ  झाला. या वेळी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित सातव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचा शुभारंभ सन्माननीय अतिथी सुप्रसिद्ध सिने अभिनेते संजय नार्वेकर, दिग्दर्शक व प्रसिद्ध अभिनेता अद्वैत दादरकर, प्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा देशमुख, सिने कलाकार भरत सालवे यांच्या हस्ते तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेचे उपाध्यक्ष व मनपा सभागृह नेते परेश ठाकूर, प्रसिद्ध नाट्य सिने निर्मात्या कल्पना कोठारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी भाजपचे शहर सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, प्रभाग समिती सभापती हेमलता म्हात्रे, नगरसेविका रुचिता लोंढे, रंगकर्मी संतोष पडाळकर, नागेश हिरवे, स्पर्धा सचिव व नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे, सांस्कृतिक सेलचे उत्तर रायगड जिल्हा संयोजक अभिषेक पटवर्धन, गणेश जगताप, अमरिश मोकल, अनिल कोळी, चिन्मय समेळ यांच्यासह रसिक प्रेक्षक उपस्थित होते.
अत्यंत नीटनेटके व उत्तम नियोजन आणि राज्यभरातून निवड झालेल्या दर्जेदार एकांकिकांचा लाभ घेत सन्माननीय अतिथी व रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत महाराष्ट्रातील मुंबई, रायगड, बारामती, धुळे, सांगली, औरंगाबाद, नाशिक, सातारा, इचलकरंजी, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, बीड, नागपूर, पुणे, कोल्हापूर, सांगली, ठाणे आदी जिल्ह्यांतील एकूण 75 एकांकिकांनी सहभाग घेतला. त्यामधून 24 एकांकिकांची महाअंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली असून शुक्रवारी नऊ एकांकिकांचे सादरीकरण, तर शनिवारी (दि. 30) नऊ आणि अंतिम दिवशी रविवारी (दि. 31) सहा एकांकिका सादर होणार आहेत.  
या वेळी सुप्रसिद्ध सिने अभिनेते संजय नार्वेकर, दिग्दर्शक व प्रसिद्ध अभिनेता अद्वैत दादरकर, प्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा देशमुख यांनी एकांकिकांचा आस्वाद घेऊन स्पर्धेच्या उत्तम नियोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले, तसेच हे व्यासपीठ कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे एक उत्कृष्ट माध्यम असल्याचे आवर्जून नमूद करून त्यांनी एकांकिकेच्या कलाकार व त्यांच्या टीमला शुभेच्छा दिल्या. देशाचे माजी पंतप्रधान व भाजपचे ज्येष्ठ नेते श्रद्धेय स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने ही स्पर्धा होत असताना त्यांच्या विचारांतून कलाकार, रसिक प्रेक्षक यांना स्फूर्ती मिळावी यासाठी स्पर्धेच्या ठिकाणी नाट्यगृहात अटलजींच्या विचारांचे पोस्टर लावण्यात आले. हे पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अटल करंडक स्पर्धेचे राज्यस्तरावरील नियोजन अत्यंत उत्कृष्ट असते. त्यामुळे कोरोनासंदर्भात शासनाचे नियम पाळून घेतलेल्या काळजीमुळे रसिक प्रेक्षकांनी एकांकिकांचा मनसोक्त आनंद घेतला.
दोन एकांकिकांच्या मधल्या वेळेत प्रेक्षकांसाठी एकांकिका व सामान्यज्ञान यावर आधारित प्रश्नोत्तरे आणि इतर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत प्रेक्षकांचाही सहभाग लक्षणीय ठरला. यादरम्यान काही प्रेक्षकांनी गाणी गात आणखी रंगत आणली.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी (29 जानेवारी) –  क्लिक (ओम साई कलामंच, वसई), लव्ह अ‍ॅण्ड रिलेशनशिप (आमचे आम्ही, पुणे), विसर्जन (श्रुजन कलामंच, बोरिवली), नंगी आवाज (कोकण ज्ञानपीठ, उरण), यंदा कर्तव्य आहे (के. इ. एस कॉलेज, मुंबई), लॉटरी तिकीट (कला कारखाना, कांदिवली), स्टार (जिराफ थिएटर, मुंबई), पँडल (रिफ्लेशन थिएटर, पनवेल), लकडबग्घा (दवेरथ थिएटर, डोंबिवली) या नऊ एकांकिकांचे सादरीकरण झाले.
दुसर्‍या दिवशी (30 जानेवारी) – वण्डरिंग बोट (एम. डी. कॉलेज, मुंबई), नातं (व्हाइट लाइट, ठाणे), आरपार (फोर्थ वॉल, ठाणे), बारस (कलांश थिएटर, रत्नागिरी), जाळ्यातील खिळे (बोलपट, पुणे),  गुंतता (निर्मिती, वसई), घरोट (नाट्यस्पर्श व भवन्स कॉलेज, मुंबई), दुसरा आइन्स्टाइन (सौ. नलिनी यशवंत दोडे विद्यालय, मुलुंड), 12 किमी (ए. एस. एम. प्रोडक्शन, मुंबई) या नऊ एकांकिकांचा प्रेक्षकांना आस्वाद घेता येणार आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply