महाड ः प्रतिनिधी : महाड तालुक्यातील विरेश्वर तलावाच्या धर्तीवर दासगाव तलावाचे पर्यटनाच्या दृष्टीने सुशोभिकरण करणार असल्याचे आमदार प्रवीण दरेकर यांनी तलावाची पाहणी करताना सांगितले. या गाळ उपसणीच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवातही करण्यात आली. याबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
महाड तालुक्यातील पाणीटंचाई भागाच्या दौर्यावर असलेले भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी 3 जून रोजी दासगाव तलावाची पाहणी केली. या वेळी त्यांच्यासोबत भाजप उपजिल्हाध्यक्ष राजेश भोसले, तालुकाध्यक्ष जयवंत दळवी, दासगावचे सरपंच दिलीप उकिर्डे, भाजप तालुका उपाध्यक्ष तेजस मिंडे, मनोहर शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता अमृत पाटील, संदीप ठोंबरे, महेश शिंदे आदी उपस्थित होते.
दरम्यान, एवढ्या सुंदर तलावाची झालेली वाताहत पाहून आ. दरेकरांचे मन हेलावले. त्यांनी दासगाव ग्रामपंचायतीला तत्काळ या तलावाचे सुशोभिकरण करण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना केल्या. तसेच आपण स्वतः या प्रकरणी जातीने लक्ष घालून विरेश्वर मंदिर तलावाच्या धर्तीवरच या तलावाचे सुशोभिकरण करणार असल्याचा विश्वास या वेळी व्यक्त केला. आ. दरेकर यांनी सदर गाळ काढण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशीही चर्चा केली.
या प्रकरणी जिल्हाधिकार्यांनी तत्काळ आदेश देताच ’गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ या योजनेंतर्गत प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी या कामाला सुरुवात केली. या ठिकाणी दोन जेसीबी आणि चार डम्परच्या साहाय्याने गाळ काढण्यात येणार आहे.