स्वाध्याय चळवळीचे अध्वर्यू आणि महाराष्ट्र-गुजरातमधील जनतेला पूज्यस्थानी असलेले थोर संत पांडुरंगशास्त्री आठवले नेहमी म्हणत असत की हे सरकार आपले आहे, अशी आत्मीयता रुजविण्यात स्वतंत्र भारतातील राज्यकर्ते फार कमी पडले आणि त्यामुळे लोकांच्यात क्षमता असूनही भारताचा भौतिक विकास अपेक्षित उंची गाठू शकला नाही. काका गाडगिळांनीही राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी जे करणे आवश्यक होते ते आम्ही केले नाही अशी स्पष्टोक्ती त्यांच्या आत्मचरित्रातून आणि अन्य अनेक लेखातून केली आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्य ही भारतासमोरची समस्या असून ती सोडविल्यावाचून स्वराज्य सुफलित होणार नाही असे शंभर वर्षांपूर्वी स्वातंत्र्य चळवळीच्या धुरीणांनी ठरविले. पण ऐक्याची भावना विकत घेण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि तेथेच आमचे चुकले असे काँग्रेस नेते सी सुब्रमण्यम म्हणाले आहेत. नेहरूवादामुळे देशभक्त आणि देशद्रोही ह्या संकल्पनात गल्लत झाली आणि राष्ट्रजीवनातील समतोल बिघडला अशी खंत श्रीप्रकाश यांच्यापासून पी. व्ही. नरसिंहराव यांच्यापर्यंत अनेक काँग्रेसी राज्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. ताज्या 19 व्या लोकसभा निवडणुकीतून जे राजकीय स्थित्यंतर झाले त्यात जनतेने नेहरूवाद पूर्णपणे नाकारला आहे हे लक्षात घेतले पाहिजे. काँग्रेस भुईसपाट झाली आणि भाजपाला निर्विवाद आणि प्रचंड बहुमत मिळाले ह्यामागे सर्वसामान्य जनतेने शांतपणे केलेला देशकालपरिस्थितीचा विचार उद्युक्त आहे. तो समजून घेतला की पुढच्या वाटचालीसाठी शिदोरी जमा होऊ शकेल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलीकडील भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनुयायांच्या निष्ठेचे आणि चिकाटीचे अनुकरण करण्याचा उपदेश आपल्या कार्यकर्त्यांना केला आहे. ही निष्ठा आणि चिकाटी केवळ शाखा लावणे आणि शारीरिक कर्मयोग करणे इतक्यापुरती मर्यादित नाही. त्यामागे विचार आहे आणि तो गेल्या नव्वद वर्षात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती निर्माण केली गेली असूनही तसूभरही कमी झाला नाही हे महत्वाचे आहे.
खिलाफत आंदोलनातून इस्लामी आतंकवादाचा साक्षात्कार झाला आणि स्वातंत्र्य चळवळ पाकिस्तानच्या दिशेने मार्ग आक्रमू लागेल काय अशी भीती उत्पन्न झाली. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हिंदू एकजुटीचा विचार काँग्रेसचे विदर्भातले क्रियावान ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी केला आणि 1925 च्या विजयादशमीला नागपूरच्या मोहिते वाड्यात संघाची शाखा सुरू झाली. त्यात बालगोपाळांचीच संख्या अधिक होती. शाखेवर प्रामुख्याने देशी खेळ खेळले जात. हा उपक्रम चांगला असला तरी एक पोरखेळ आहे असेच त्यावेळचे समाजधुरीण मानत होते आणि मोठ्या अपेक्षा त्यांनी ठेवल्या नव्हत्या. पण 1940ला डॉक्टरांचे देहावसान झाले आणि त्या वर्षी नागपूरला झालेल्या संघ शिक्षा वर्गास देशाच्या अनेकानेक भागातून स्वयंसेवक सहभागी झाले होते. मी संपूर्ण हिंदुस्थान एकसंध झालेला प्रतिक रूपात आज येथे पाहतो आहे अशा आशयाचे त्यावेळचे डॉक्टरांचे समाधानाचे उद्गार आहेत. भाजपाला आज जो धष्टपुष्ट जनाधार मिळाला आहे त्यामागे हिंदुहित आणि राष्ट्रहित समान मानून त्या केवलानंदात आत्यंतिक कर्तव्यनिष्ठेने कर्मयोग आचरणार्या लोकेषणाविरहित स्वयंसेवकांची पुण्याई कारणीभूत आहे.
शरद पवारांनी स्वयंसेवकांच्या निष्ठेचे आणि चिकाटीचे अनुकरणीय म्हणून कौतुक केले आहे. हे कशासाठी आणि कसे साध्य केले ते पाहणे उद्बोधक आहे. बाराशे वर्षाच्या पारतंत्र्यातून बाहेर पडण्याचा विचार मुख्य आहे. हे काम केवळ पुढार्यांचे नाही तर ते प्रत्येकाचे आहे हे सूत्र आहे. म्हणजे प्रत्येकाचे मानसिक परिवर्तन अपेक्षित आहे. ते दैनंदिन संपर्कातून आणि शुद्ध आचरणातून साधायचे आहे. म्हणून ठरल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी शाखा लागलीच
पाहिजे, कोणी कोणाला जात विचारायची नाही आणि स्वयंसेवकांच्या घरच्यांशीही पूर्णपणे आत्मीय भावाने संबंध निर्माण केले पाहिजेत अशी बंधने स्वयंसेवकांनी स्वतःवर घालून घेतली. भारतात लाखाहून अधिक ठिकाणी गेली नव्वद वर्षे प्रत्येक सकाळी आणि संध्याकाळी स्वयंसेवक एकत्र जमतात ,भगव्या ध्वजाला प्रणाम करतात, भारतमातेचे स्तवन करतात. हा संस्कार अनमोल आहे. देशाला जननीस्वरूपात पाहायची सवय लागल्याने संघाचे नेते स्वतःला प्रेषित समजत नाहीत. ते भाविक असतात. गेली नव्वद वर्षे हे सामान्य वाटणारे स्वयंसेवक कोणत्याही प्रतिकूलतेसमोर डगमगले नाहीत आणि कोणत्याही प्रलोभनाला बळी पडले नाहीत. पूर्णपणे प्रसिद्धीपराङ्मुख राहून हिंदू एकजुटीचे व्रत त्यांनी पार पाडले. संघात खेळ होतात कारण माती अंगाला लागते, उच्चनीच भाव गळून पडतो आणि परस्परांविषयी अतूट विश्वास निर्माण होतो. ह्या विश्वासातून एकत्वाची जाणीव निर्माण झाली आणि एकत्वाची जाणीव म्हणजेच राष्ट्रीयत्व. पारतंत्र्यातून मुक्त व्हायचेच पण जागतिक अवकाशात मनुज मंगलाचे तत्वज्ञान प्रत्यक्षात आणण्याचे योगदान हिंदूला करावयाचे आहे हा संकल्प संघविचाराचे मुख्य धागा आहे. त्यातून वंचित समाजाचे उन्नयन करून त्याला मुख्य प्रवाहात आणण्याचे एकामागून एक प्रकल्प संघाने 1940 नंतर सुरु केले. आज देशात सरकारचे म्हणून जेवढे विकास प्रकल्प चालू असतील त्याखालोखाल संघाचे विकास प्रकल्प कार्यवाहीत आहेत हे विशेष आहे. ही आईची सेवा आहे. त्यामुळे ह्या कामाचा गाजावाजा केलेला नाही. भाजपच्या यशामागे ही निस्पृहपणे केलेल्या कामाची पुण्याई उभी आहे.
संघाचे काम हे जगातले मोठे आश्चर्य आहे. हिंदू हा प्राणी मूलत: अध्यात्मवादी असूनही त्याच्यात कृतिप्रवण समष्टीभाव जागृत करण्यात संघाने चिकाटीने यश मिळविले आहे. पवारांच्या वक्तव्याने कदाचित महाराष्ट्रातील बुद्धीजिवी वर्गाला म्हणजे ग्राम्य भाषेत बोलायचे तर समाजवाद्यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीचा अन्वय आणि अर्थ लावण्यासाठी वेगळा विचार करावा असे वाटू शकेल. खरे म्हणजे कुमार सप्तर्षींच्या सत्याग्रही मासिकाचा जूनचा अंक वाचल्यावर समाजवादी बदलतील असे वाटत नाही. त्यांनी सदोष मतदान यंत्रांमुळे मोदी जिंकले असाच निष्कर्ष काढला आहे. मोदी दुसर्यांदा सत्तेवर आल्यामुळे समाजात भेदभाव आणि असमतोल शिगेला पोचून अराजक माजणार अशी भविष्यवाणी भाजपविरोधी विचारवंत करू लागले आहेत. जे झाले ती प्रतिक्रांती आहे आणि जनता लोकशाहीस पात्र होण्याइतकी प्रगल्भ झालेली नाही असा निर्वाळा सप्तर्षींनी दिला आहे. हा जनतेचा अपमान आहे. आम्ही नेहरूंच्या चष्म्यातून हिंदू-मुस्लिम प्रश्नाकडे पाहिले ही आमची चूक झाली असे 1942 च्या ’ चले जाव ’चळवळीचे थोर नेते अच्युतराव पटवर्धन म्हणाले होते. आज सगळी जनता त्या स्पष्टोक्तीची पुनरुक्ती कृतीने करून मोकळी झाली आहे. नेहरूवाद हिंदूंना शोषक आणि मुसलमानांना शोषित समजतो. संघविचार मुसलमानांना सहोदर समजतो आणि हिंदूंना आत्मभान आले आणि ते आपली ऊर्जा समर्पित वृत्तीने राष्ट्रविकासाच्या कामी एकवटू लागले की मुसलमान आपोआप मुख्य प्रवाहात सामील होतील हा संघाला विश्वास आहे.
जेवढे म्हणून वंचित घटक असतील त्यांनी आपल्या अपेक्षा पुढील तीन-चार महिन्यात मोदी सरकारला निश्चित स्वरूपात सादर केल्या तर सामाजिक न्याय आणि राष्ट्रविकास यांच्यात समन्वय साधण्याचे जे काम पुढील पाच वर्षासाठी नियोजनात आणण्याचा विचार चालू आहे. त्याला सकारात्मक हातभार लावल्यासारखे होईल. मागाहून टीका करण्यापेक्षा आधी बोललेले बरे असते.
-अरविंद विठ्ठल कुळकर्णी, मो. क्र. 9619436244