पनवेल : बातमीदार : भूखंड देतो असे सांगून पनवेल येथील एका व्यापार्याची तब्बल एक कोटी 68 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. शहर पोलीस ठाण्यात भाग्यलक्ष्मी बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सचे प्रो.प्रा. राजेंद्र दर्यावसिंग राजपूत यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल प्रदीपकुमार भटनागर (40 वर्षे) यांचा पनवेल इंडस्ट्रीयल इस्टेट, मे. प्रदीप मास्टरबचेस प्रा. लि. या नावाने प्लॅस्टिक प्रॉडक्ट बनविण्याचा व्यवसाय आहे. ते नवी मुंबई परिसरामध्ये व्यवसायासाठी मोठ्या भूखंडाच्या शोधात असतानाच त्यांच्या ओळखीचे शिवाजी देसाई व एजंट विक्रम नेगी यांच्यासोबत भाग्यलक्ष्मी बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सचे भागीदार राजेंद्र डी. राजपूत हे 2008 मध्ये त्यांच्या पनवेल येथील कार्यालयात आले होते. या वेळी शेतकरी हरीभाऊ पाटील, कृष्णा पाटील, अनंत पाटील, वेनुबाई पाटील व भीमाबाई पाटील (रा. भेंडखळ, उरण) यांना मौजे भेंडखळ सर्व्हे नं. 57/5 व इतर या जमिनीच्या संपादनापोटी सिडकोकडून मिळणारा 2100 व 650 चौरस मीटरचा भूखंड त्यांनी तोंडी विकत घेतल्याचे व नमूद भूखंडाच्या कागदपत्रांची सिडकोमध्ये पडताळणी स्वतः केल्याचे राजपूत यांनी सांगितले. या वेळी तो भूखंड भटनागर यांनी घेण्याचे त्यांच्यात ठरले. 2750 चौरस मीटरचा भूखंड 16 हजार 900 रुपये प्रती चौरस मीटर याप्रमाणे चार कोटी 64 लाख 75 हजार रुपयांना विकत घेण्याचे 2008 मध्ये मेमोरंडम आँफ अंन्डरस्टॅडिंगद्वारे ठरले.
या वेळी भटनागर यांनी राजेंद्र राजपूत यांना 2008 मध्ये एक कोटी 40 लाख रुपये दिले. सदरची रक्कम शेतकरी यांना दिलेली असून भूखंड लवकरात लवकर तुमच्या नावावर करण्यात येईल, असे राजेंद्र राजपूत याने भटनागर यांना सांगितले. त्यानंतर सप्टेंबर 2008 मध्ये राजेंद्र राजपूत याने भटनागर यांची भेट घेऊन शेतकरी यांना 2750 चौरस मीटरऐवजी 2100 चौरस मीटरचा भूखंड मिळणार असल्याने नवीन करारनामा बनविणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे शेतकरी हरिभाऊ पाटील व इतर यांना सिडकोकडून मिळणारा 2100 चौरस मीटर भूखंड नमूद शेतकरी यांच्याकडून विकत घेऊन तो भूखंड राजेंद्र राजपूत यांनी भटनागर यांना विक्री केल्याबाबत करारनामा बनविला. या वेळी शेतकरी यांना देण्यासाठी 25 लाखांची आवश्यकत् असल्याचे राजेंद्र राजपूत यांने भटनागर यांना सांगून 25 लाख रुपये स्वतःच्या बँक खात्यात स्वीकारले. त्यानंतर पुन्हा काही रक्कम त्यांना देण्यात आली, मात्र तरीदेखील राजपूत यांनी भूखंड भटनागर यांच्या नावावर केला नाही. त्यामुळे भटनागर यांनी शेतकर्यांची भेट घेतली व या वेळी आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी राजेंद्र राजपूत यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी केली, मात्र त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. शहर पोलीस ठाण्यात भाग्यलक्ष्मी बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सचे राजेंद्र दर्यावसिंग राजपूत यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper