Breaking News

नवीन पनवेलमधील सिडकोच्या विविध विकासकामांस मंजुरी

पनवेल ः प्रतिनिधी

सिडकोतर्फे नवीन पनवेल नोड्समध्ये विविध स्वरूपाची अंदाजे 33 कोटींची विकासकामे लवकरच हाती घेण्यात येणार आहेत. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सिडको संचालक मंडळाच्या 7 जून रोजी पार पडलेल्या बैठकीत या निर्णयास मंजुरी देण्यात आली. या दुरुस्तीच्या कामांत स्टॉर्म वॉटर ड्रेन व पदपथांची दुरुस्ती, रस्त्यांचे रिसरफेसिंग यांचा समावेश आहे.

सिडकोने 1980च्या दशकात पनवेल नोड विकसित करण्यास सुरुवात केली. सदर पनवेल नोडमध्ये पनवेल पूर्व व पनवेल पश्चिम या दोन भागांचा समावेश असून, पनवेल पूर्व भागाचे विभाजन 21, तर पनवेल पश्चिम भागाचे विभाजन 18 सेक्टरमध्ये करण्यात आले आहे. पनवेल नोड विकसित करताना सदर नोडमध्ये रस्ते, मलनि:स्सारण वाहिन्या, जलवाहिन्या, स्टॉर्म वॉटर ड्रेन, पदपथ आदी पायाभूत सुविधा विकसित करण्यात आल्या. सध्या अस्तित्वात असलेले स्टॉर्म वॉटर ड्रेन हे युसीआर प्रकारातील असून अनेक सेक्टर्समधील युसीआर ड्रेन व्यवस्था जुनी झाली आहे. घुशींनी पोखरल्यामुळे युसीआर ड्रेन वॉलला भगदाडे पडली आहेत, तर काही ठिकाणी भिंतींची पडझड झाली आहे. नवीन पनवेलमध्ये एकूण 62 किमीचे रस्त्यांचे जाळे सिडकोतर्फे विकसित करण्यात आले आहे. काही वर्षांपूर्वी  रस्त्यांचे रिसरफेसिंगचे काम करण्यात आले होते, परंतु सद्यःस्थितीत काही सेक्टर्समधील रस्त्यांवर खड्डे पडल्याने पादचारी, वाहनचालकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.

पनवेल महापालिकेंतर्गत येणारे नोड महापालिकेस सिडकोतर्फे  हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नवीन पनवेल नोडची सिडको व पनवेल महापालिका यांच्यातर्फे2017मध्ये संयुक्त पाहणी करण्यात आली होती. पाहणीवर आधारित अहवाल तयार करण्यात येऊन त्यात विविध दुरुस्तीची कामे व त्यासाठीचा अंदाजित खर्च मांडण्यात आला होता. नवी मुंबई महापालिकेप्रमाणेच पनवेल महापालिकेच्या अधिकारक्षेत्रांतर्गत येणारे नोड तेथे विकसित करण्यात आलेल्या पायाभूत सुविधांसह जे आहे, जेथे आहे तत्त्वावर हस्तांतरित करण्यात यावेत याबाबतचा ठराव सिडको संचालक मंडळाने सन 2017मध्ये मंजूर केला होता, परंतु पनवेल महापालिकेने सुस्थितीतील पायाभूत सुविधांसह नोड हस्तांतरित करण्याबाबतची विनंती सिडको महामंडळास केल्याने पनवेल नोडमध्ये दुरुस्तीची कामे हाती घेण्याचा निर्णय सिडकोतर्फे घेण्यात आला.

या दुरुस्ती कामांतर्गत नवीन पनवेल (पूर्व) येथील सेक्टर 1 ते 11मधील स्टॉर्म वॉटर ड्रेन व पदपथांची दुरुस्ती, रस्त्यांचे रिसरफेसिंग व नवीन पनवेल (प.) येथील सेक्टर 1 ते 18मध्ये मातीचा भराव घालणे, मोडकळीस आलेल्या पीसीसी भिंती व पदपथ निष्कासित करणे, शहाबादी फरशी व पेव्हर ब्लॉक बसवणे, रस्त्यांचे रिसरफेसिंग आदी कामांचा समावेश आहे. नवीन पनवेलच्या पूर्व-पश्चिम भागांत करण्यात येणारी सदर दुरुस्तीची व विकासकामे प्रत्येकी 18 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होणे प्रस्तावित आहेत. या कामांकरिता 33 कोटी इतका अंदाजित खर्च असून या कामांकरिता लवकरच निविदा प्रक्रियेस सुरुवात होणार आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply