Breaking News

पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे; कारवाईची मागणी

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बिल्डर लॉबी सक्रीय झाली असून अनेक ठिकाणी विनापरवाना नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीररीत्या इमारती उभारण्याचे काम जोरात सुरू असून यामध्ये सर्वसामान्य नागरिक भरडले जात असल्याने पनवेल शहरासह पनवेल तालुका, खांदेश्वर, कामोठे, खारघर, तळोजा आदी पोलीस ठाण्यामध्ये अशा प्रकारचे फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्वसामान्य नागरिक प्रामुख्याने मुंबई व परिसरातील नोकरी करणारे किंवा छोटा-मोठा व्यवसाय करणार्‍यांना, रहिवाशांना आकर्षक जाहिरातीद्वारे पनवेल परिसरातील सुकापूर, भगतआळी, आदई, मालवाडी आदी भागांसह तळोजा परिसर, कामोठे परिसर व खारघर ग्रामीण भाग, तळोजा मजकूर आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बांधकाम व्यवसायाची कामे सुरू असून अत्यंत अल्प दरात तुम्हाला घरे देण्यात येतील अशा प्रकारे ग्राहकांकडून बुकिंग घेऊन त्यानंतर काही जणांनी सर्व नियम धाब्यावर बसवून, अनेकांनी तर नैना, पनवेल महानगरपालिका, सिडको व संबंधित खात्यांच्या परवानग्या न घेता बांधकामे सुरू केली आहेत. काही बांधकाम व्यावसायिकांनी स्थानिक ग्रामपंचायतींमधील सदस्य, तसेच ग्रामसेवकांचे हात ओले करून आपल्या तात्पुरत्या परवानग्या घेऊन कामे सुरू केली आहेत व ह्याच परवानग्या ते बुकिंग घेताना ग्राहकांना दाखवित असून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळत आहेत. अनेक ठिकाणी पाणी पिण्याची व्यवस्था नाही. सांडपाणी जाण्याची व्यवस्था नाही, काही ठिकाणी रस्ते व गल्ल्या अडचणीच्या ठरत आहेत. असे असतानाही बिनदिक्कतपणे हे बांधकाम व्यावसायिक आपली कामे सुरू करीत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या तक्रारी पोलीस ठाण्यात रोज येताना दिसत आहेत. यापूर्वी सुद्धा पोलिसांनी अशा प्रकारे फसवणूक करणार्‍या बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध कडक कारवाई केली आहे. तरीही अजूनही कोणतीही भीती न बाळगता हे बांधकाम व्यावसायिक आपली कामे करीत असल्याचे दिसून येत आहे. तरी अशा प्रकारची कामे तत्काळ बंद पाडावीत, अशी मागणी त्रस्त ग्राहक करीत आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply