उरण : बातमीदार/वार्ताहर
वटपौर्णिमा जवळ आली असल्याने घाऊक बाजारात कच्च्या फणसासोबत पिकलेल्या फणसाची चांगली आवक सुरू झाली आहे. त्यामुळे उरण बाजारात फणसाचा गोड सुगंध सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. वटपौर्णिमेला फणसाला मोठी मागणी असते. त्यामुळे ही आवक अधिकच वाढणार आहे.
वाशीतील घाऊक बाजारात वर्षभर कच्च्या फणसाची आवक होते. कर्नाटक, तमिळनाडू मधून एक ते दोन गाड्या बाजारात येतात. हा फणस ग्राहक भाजीसाठी घेऊन जातात, मात्र उन्हाळा सुरू झाला की पिकलेला फणस सर्वांचे लक्ष वेधून घेतो. उन्हाळ्यापासून बाजारात पिकलेल्या फणसाच्या 2 ते 3 गाड्या बाजारात यायला सुरुवात होते. कोकणातील फणस म्हणून फणसाची ओळख असली, तरी सध्या नवी मुंबईच्या बाजारात मात्र दक्षिण भारतातून फणसाची मोठी आवक होत असते. वटपौर्णिमेसाठी मात्र कोकणातूनही फणस बाजारात येतो. त्यामुळे फणसाची अवाक वाढते. 25 ते 30 गाड्यांची आवक होते. आता वटपौर्णिमेपर्यंत ही आवक अधिक वाढेल. सध्या घाऊक बाजारात कच्च्या फणसाचे दर 15 ते 20 रुपये किलोपर्यंत आहेत, तर पिकलेल्या फणसाचे दर 16 ते 36 रुपये किलो आहेत. कोकणातून येणारा फणस काटेरी असतो, तर दक्षिण भारतातून येणारा फणस हा मोठा आणि गोल काट्यांचा असतो. त्यामुळे ते टोचत नाहीत. यातील गरेही मोठे असतात. यात कापा जातीचाच फणस अधिक असतो. त्याला चांगली मागणी असते. किरकोळ बाजारात या फणसाचे गरे 70 ते 80 रुपये किलोच्या घरात मिळतात. उरणच्या बाजारात नाक्यानाक्यांवर फणस विक्रीसाठी आणल्याचे चित्र पाहावयास मिळते.