नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
सिडकोच्या बेलापूर किल्ला संवर्धन व सुशोभीकरण उपक्रमाचे उद्घाटन रविवारी (दि. 16) सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. समारंभाच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र राज्य हे भूषवणार आहेत. या उपक्रमांतर्गत नवी मुंबईतील सीबीडी-बेलापूर येथील पोर्तुगीजकालीन किल्ल्याचे संवर्धन करून किल्ला व किल्ल्याभोवतालचा परिसर सिडकोतर्फे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यात येणार आहे.
संवर्धन व सुशोभीकरण उपक्रमांतर्गत बेलापूर किल्ल्याला नवीन झळाळी प्राप्त करून देण्यासाठी तेथील बुरूजांचे संवर्धन करण्यात येणार आहे. नव्याने बांधकाम करण्यात येणार्या ठिकाणी त्या काळातील बांधकाम सामग्री व बांधकाम शैलीचा वापर करण्यात येणार आहे. संवर्धन व सुशोभीकरण उपक्रमाकरिता रुपये 17 लाख इतका खर्च अंदाजित आहे. बेलापूर किल्ला संवर्धन व सुशोभीकरण या सिडकोच्या उपक्रमामुळे भविष्यात बेलापूरचा किल्ला हे नवी मुंबईचे भूषण ठरणार असून पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.