Breaking News

सुपर चषकावर चेल्सीची मोहोर

बेलफास्ट ः वृत्तसंस्था

बदली गोलरक्षक केपा अरिझाबलगाने मोक्याच्या क्षणी अडवलेल्या दोन पेनल्टीच्या बळावर चॅम्पियन्स लीग विजेत्या चेल्सीने आणखी एका जेतेपदावर मोहोर उमटवली. बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी ‘सडन डेथ’पर्यंत रंगलेल्या सुपर चषकाच्या अंतिम फुटबॉल सामन्यात चेल्सीने व्हिलारेयालला 1-1 (6-5) असे नेस्तनाबूत केले. थॉमस टुकेल यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणार्‍या चेल्सीसाठी हकिम झियेचने 27व्या मिनिटाला पहिला गोल केला. मध्यांतरापर्यंत त्यांना 1-0 अशी आघाडी कायम राखण्यात यश आले, परंतु 73व्या मिनिटाला जेरार्ड मोरेनोने व्हिलारेयालला बरोबरी साधून दिली. त्यानंतर अतिरिक्त वेळेपर्यंत दोन्ही संघांतील खेळाडूंनी गोल करण्यासाठी अथक प्रयत्न केले. सामना पेनल्टी शूटआउटपर्यंत लांबणार हे स्पष्ट झाल्यावर चेल्सीने 119व्या मिनिटाला एडयुआर्ड मेंडीऐवजी नव्या दमाच्या केपाला बदली गोलरक्षक म्हणून पाठवले. 26 वर्षीय केपाने निर्णायक वेळी दोन पेनल्टी अडवून चेल्सीच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे प्रशिक्षक टुशेल यांच्यासह चेल्सीच्या सर्व खेळाडूंनी त्याला डोक्यावर उचलून जल्लोष केला. चेल्सीने दुसर्‍यांदा सुपर चषकाचे जेतेपद मिळवले. यापूर्वी 1998मध्ये त्यांनी रेयाल माद्रिदला पराभूत केले होते. बार्सिलोना आणि ए. सी. मिलान या संघांनी सर्वाधिक पाच वेळा सुपर चषक उंचावला आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply