अलिबाग ः प्रतिनिधी
येथील जिल्हा नियोजन भवन या नवीन इमारतीचे शनिवारी (दि.15) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थाटात ई-उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडीओ संदेश पाठवून रायगड जिल्हावासीयांना शुभेच्छा दिल्या. तसेच अलिबाग येथे जिल्हा प्रशासनाची सर्व कार्यालये एकाच ठिकाणी आणण्यासाठी नवीन प्रशासकीय इमारतीच्या रु.50 कोटी रुपायांच्या प्रस्तावास लवकरच मान्यता देऊ, अशी घोषणाही फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे केली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणा शेजारी आयोजित या सोहोळ्यास राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक तथा पालकमंत्री रायगड रविंद्र चव्हाण, सिडकोचे अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, आ. भरतशेठ गोगावले, आ. मनोहर भोईर तसेच प्रभारी जिल्हाधिकारी भरत शितोळे, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव तसेच सर्व यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचा डिजिटल व्हिडिओ संदेश उपस्थितांनी ऐकला व त्यानंतर पालकमंत्री रविंद्र चव्हाण व अन्य उपस्थित मान्यवरांनी कोनशीला अनावरण केले. त्यानंतर फित कापून सर्व मान्यवरांनी इमारतीत प्रवेश केला व पाहणी केली. त्यानंतर आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत इमारतीचे वास्तू विशारद श्री. परब व कंत्राटदार अमित नारे तसेच तत्कालीन जिल्हा नियोजन अधिकारी राजेश तितरे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.