कर्जत : प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील शिरसे हे मूळ गाव असलेली, मुद्रे गावात लहानाची मोठी झालेली आणि विवाहानंतर बेलापूर येथे वास्तव्यास असणारी अर्चना देशमुख हिला या वर्षी ’दि बॉम्बे आर्ट सोसायटी’ या मुंबईतल्या प्रसिद्ध कला संस्थेने तिच्या अमूर्त चित्रासाठी पुरस्काराने सन्मानित केले आहे.
दि बॉम्बे आर्ट सोसायटी ही संस्था गेली सव्वाशे वर्षे मुंबईमध्ये कार्यरत आहे. आजवर एम. एफ. हुसेन, बेंद्रे, रजा, वासुदेव गायतोंडे अशा अनेक मातब्बर चित्रकारांची चित्रे या संस्थेच्या प्रदर्शनामध्ये पुरस्काराने सन्मानित करण्यात आली आहेत. यावर्षी संस्थेचे 127 वे अखिल भारतीय वार्षिक प्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे 19 ते 25 फेब्रुवारी या कालावधीत भरविण्यात आले आहे.
संस्थेच्या दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये अर्चना देशमुख हिला तिच्या अमूर्त चित्रासाठी सन्मानित करण्यात आले. तिचे हे चित्र ऍक्रेलिक रंगामधील आहे. या वेळी पुरस्कार प्रदान करण्यासाठी प्रसिद्ध व्यंगचित्रकार राज ठाकरे, सुप्रसिद्ध चित्रकार सुहास बहुलेकर, वासुदेव कामत, अनिल नाईक, ललित कला अकादमीचे अध्यक्ष उत्तम पाचरणे उपस्थित होते. हा सन्मान मिळवणारी अर्चना देशमुख ही कर्जतची पहिली महिला चित्रकार ठरली आहे.
यापुर्वी अर्चना देशमुख हिच्या चित्रांची प्रदर्शने मुंबईतील आर्ट प्लाझा, नेहरू सेंटर, कोहिनूर कॉन्टिनेन्टल अशा अनेक आर्ट गॅलरीजमध्ये भरविण्यात आली आहेत. अर्चनाचे विशेष कौतुक करण्यासारखी बाब म्हणजे, तिने चित्रकलेसाठी एका बँकेतली गलेलठ्ठ पगाराची परमनंट नोकरी सोडून दिली आणि पूर्णवेळ चित्रकलेची साधना करू लागली. म्हणूनच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे पती आणि सासू-सासर्यांना ती आपल्या यशाचे पूर्ण श्रेय देते.