Breaking News

खालापुरात विकासापाठोपाठ चोर पावलांनी वाढतेय गुन्हेगारी

स्मार्ट सिटी म्हणून विकासाच्या वाटेवर वाटचाल करणार्‍या खालापूर तालुक्यात गुन्हेगारीने हातपाय पसरल्यामुळे विकासाबरोबर वाढणारी कीड वेळीच ठेचावी लागणार आहे. खालापूर तालुका औद्योगिक नगर आणि धार्मिक नगरी अशी ओळख आहे. गेल्या 30 वर्षात कारखानदारीचा मोठा वाटा खालापूरच्या विकासात राहिला आहे, परंतु मधल्या काळात कारखानदारीवर आलेली अवकळा यामुळे खालापूर तालुक्याच्या विकासाला खीळ बसली होती. त्याला चालना मिळाली ती नवी मुंबई येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे.

विमानतळ परिसरातील 30 किलोमीटरमध्ये सुनियोजित शहर असावे या हेतूने नैना, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी विकास आराखडा बनवताना खालापूर तालुक्यातील खोपोली वगळता सर्वच भाग समाविष्ट केला. विकासाची चाहूल घेत परप्रांतीय लोंढे खालापूर तालुक्यात धडकत असून मिळेल त्या ठिकाणी वस्ती करून राहत आहेत, परंतु या उभ्या राहणार्‍या झोपड्यांमधून गुन्हेगारीचा अड्डा बनत असून गुन्हेगारीला आश्रय देणार्‍या स्थानिकांचा पुढाकार गंभीर बाब बनली आहे.

खोपीली शिळफाटा परिसरातील पटेलनगर वस्तीत राहणार्‍या साडेचार वर्षांच्या बालिकेचा मृतदेह अतिशय क्रूर पद्धतीने हत्या केलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उङाली असून बालिकेवर अत्याचार झाल्याची, तसेच नरबळीच्या चर्चा सर्वत्र सुरू असताना पोलिसांनी 24 तासांत आरोपीला अटक केल्यामुळे जनक्षोभ टळला. या चिमुरडीचं धड आणि शीर असे दोन तुकडे करून झाडीत वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात आले होते. सुरुवातीला नरबळीची शक्यता वाटत असताना नंतर परप्रांतीय तरुणाने वासनेतून हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. सदर घटना घडलेल्या परिसरात परप्रांतीयांचा भरणा दिवसेंदिवस वाढत चालला असून अनधिकृत वाढत्या वस्तीला स्थानिक नेता जबाबदार आहे. याच झोपडपट्टीत गांजाच्या व्यवसायाचे रोपटे वाढत आहे. काही दिवसांपूर्वी खोपोली रेल्वेस्थानक परिसरात गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या झाकिर सलीम शेखच्या खोपोली पोलिसांनी मुसक्या आवळल्यानंतर गांजा विक्रीच्या काळ्या धंद्याचा भांडाफोड झाला. झाकिर शेख जवळ सापडलेल्या 13 किलो गांजावरून नशेची व्याप्ती किती वाढत आहे याचा अंदाज येतो. खालापूरकरिता धोक्याची घंटा वाजत असून शिक्षणासाठी, नोकरीसाठी आसपासच्या गावातून खोपोलीकडे स्थलांतरित होत असलेल्या सुशिक्षित कुटुंबाचे मात्र धाबे दणाणले आहेत. जागोजागी असलेल्या भंगार दुकानाची संख्या आणि भंगारात आलेला माल, तसेच रात्रीच्या वेळेस होणारी उलाढाल यात परप्रांतीय हात गुंतले असून खालापूर परिसरातील कारखान्यात चोरी होणारा माल भंगाराच्या अड्ड्यावर नुकताच सापडला होता. या टोळीचा म्होरक्या आणि भंगार व्यावसायिक देखील परप्रांतीय होता.

खालापूर तालुक्यात घडणार्‍या  गुन्हेगारीचा वाढता आलेख पाहिला तर परप्रांतीय टक्का जास्त असून  परप्रांतीयांना आश्रय देताना संपूर्ण माहिती ठेवणे बंधनकारक करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसणे गरजेचे आहे. खालापूर तालुक्याची धारावीकडे वाटचाल होण्याअगोदरच अपप्रवृत्तीला लगाम बसण्यासाठी कारवाईची गरज असून सुरक्षित खालापूर सर्व स्तरातून एकत्र येणे आवश्यक आहे. खालापूर पोलीस ठाणे अंतर्गत वावोशी व चौक दूरक्षेत्र असून 73 कर्मचार्‍यांची गरज असताना केवळ 58 कर्मचारी आहेत. जवळपास 15 कर्मचारी कमी आणि सर्वाधिक गुन्हे घडणारा तालुका यामुळे कर्मचार्‍यांची दमछाक होते. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती मार्ग, इमॅजिका आंतरराष्ट्रीय थीम पार्क, महड देवस्थान आणि संवेदनशील मोरबा धरण. खालापूर तालुक्यात खोपोली, रसायनी आणि खालापूर मुख्य पोलीस ठाणे असून या तीन ठाण्यांतर्गत 2019 या नवीन वर्षात केवळ 50 दिवसांत शंभर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. म्हणजे दिवसाला सरासरी दोन गुन्हे घडत असून प्रमाण चिंताजनक आहे.

Check Also

हम दिल दे चुके सनम @ 25

उत्कंठामय गोष्ट, देखणं सादरीकरण समीर (सलमान खान) भारतीय शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी या कलेतील निष्णात पंडित …

Leave a Reply