नागोठणे : प्रतिनिधी
आपटा येथे एसटी बसमध्ये सापडलेल्या स्फोटकांनंतर एसटी महामंडळाने रायगडमधील बसस्थानकांमध्ये दक्षता बाळगण्यास प्रारंभ केला असल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत नागोठणे येथील बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक भालचंद्र शेवाळे यांना विचारले असता, रोहे आगाराकडून येथे त्या संबंधीचे पत्र आले असून प्रवाशांना त्याची माहिती होण्यासाठी स्थानकाच्या आवारात त्या पत्राच्या प्रती विविध ठिकाणी चिकटवण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
बेवारस वस्तूंना हात लावू नये, आवारात बेवारस वस्तू आढळून आल्यास प्रवाशांनी तातडीने त्याची माहिती, वाहतूक नियंत्रक किंवा चालक, वाहकांना द्यावी. एसटीच्या चालक – वाहकांनी अनधिकृत पार्सल स्वीकारू नये. बसस्थानकात अनोळखी व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्यास वाहतूक नियंत्रकांच्या निदर्शनास आणून द्यावे. वाहतूक नियंत्रकानी दर तासाने स्थानकाचे आवारात फेरी मारावी. एसटी बसच्या खिडकीतून सामान किंवा बॅग तसेच पिशवी न टाकण्याबाबत प्रवाशांना सूचना देणे. ध्वनिक्षेपकावरून प्रवाशांना वारंवार सूचना देणे, असे या पत्रकात स्पष्ट केले असल्याचे शेवाळे यांनी सांगितले.
या संदर्भात नागोठणे पोलीस ठाण्याचे लक्ष वेधले असता, प्रवाशांनी जागृत राहण्यासाठी तातडीने नागोठणे बसस्थानकाच्या आवारात आमच्या वतीने सूचना फलक लावण्यात येणार असल्याचे पोलीस ठाण्याचे निलेश महाडिक यांनी स्पष्ट केले.