नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
पाकिस्तानी तुरुंगात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत दिली. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांची सुटका करावी, अशी मागणी करतानाच जाधव यांच्यासाठी सरकारचा लढा सुरूच राहील, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.
संपूर्ण देश हा कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांसोबत आहे, असे आश्वासन जयशंकर यांनी सभागृहात दिले. अत्यंत कठीण परिस्थितीत खंबीर राहणार्या जाधव यांच्या कुटुंबीयांचेही त्यांनी कौतुक केले आहे. या संवेदनशील मुद्द्यावर भारताने मिळवलेल्या विजयाने संपूर्ण सभागृह निश्चितच आनंदी झाले असेल. जीवघेण्या कठीण परिस्थितीतही जाधव यांच्या कुटुंबीयांनी खंबीर राहून समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. सरकार जाधव यांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न सुरूच ठेवणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानवरील आंतरराष्ट्रीय दबाव सातत्याने वाढत आहे.
जाधव यांच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा संकल्प 2017 मध्ये सरकारने संसदेत सोडला होता. सरकारने त्यादृष्टीने अथक प्रयत्न केले. त्यात आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याच्या प्रक्रियेचाही समावेश आहे. सरकारने केलेल्या या प्रयत्नांचे हे सभागृह नक्कीच कौतुक करेल, अशी खात्री आहे. विशेषतः हरिश साळवे आणि त्यांच्या सहकार्यांचे कौतुक करायलाच हवे, असेही जयशंकर यांनी सभागृहात सांगितले.