Breaking News

कारखान्यांतील सांडपाणी थेट नाल्यात; ‘सावित्री’चे प्रदूषण वाढले

महाड ः प्रतिनिधी

महाड औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखाने पावसाचा फायदा घेत रासायनिक सांडपाणी थेट नाल्यात सोडत आहेत. हे रासायनिक सांडपाणी नाल्यांमार्गे थेट सावित्री खाडीला मिळत असल्याने सध्या ही खाडी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. यामुळे खाडीकिनारी असणारी शेती आणि मासेमारी धोक्यात आली आहे. या प्रकारामुळे स्थानिकांत असंतोष पसरला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील तीन महिन्यांपासून संपूर्ण भारतात लॉकडाऊन सुरू होते. लॉकडाऊन काळातही महाड औद्योगिक क्षेत्रातील जवळपास बहुतेक कारखाने सुरूच आहेत. गेली 15 दिवस पावसानेदेखील जोरदार हजेरी लावली आहे. याचाच फायदा घेत महाड औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखानदारांनी रासायनिक सांडपाणी थेट कारखान्यांना लागून असलेल्या नाल्यांमध्ये सोडले आहे. त्यामुळे सध्या हे सर्व नाले हिरवे, पिवळे, लाल झाल्याचे दिसत आहेत. या कारखानदारांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा वचक राहिलेला दिसून येत नाही. नाल्यामार्गे सोडले जाणारे हे सांडपाणी थेट सावित्री खाडीमध्ये मिसळत आहे. त्यामुळे सावित्री खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असून

त्यामुळे खाडीकिनारी असलेली भातशेती आणि मासेमारी धोक्यात आली आहे.

मणीराम ऑर्गनिक्स कारखान्याचे रासायनिक सांडपाणी थेट नाल्यामध्ये येत होते. त्याचे नमुने घेऊन कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रात तपासणी सुरू आहे. जो कोणी कारखाना रासायनिक टाकाऊ पाणी सोडताना आढळेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.

– श्री. औटी, प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ

Check Also

पेणमध्ये आज आमदार रविशेठ पाटील यांचे शक्तीप्रदर्शन

पेण ः प्रतिनिधी विधानसभेची लगबग सर्वत्र सुरू आहे. पेण मतदारसंघातून भाजपचे माजी मंत्री आमदार रविशेठ …

Leave a Reply