Breaking News

उरणमध्ये पूर्व परवानगीशिवाय घराचे अनधिकृत बांधकाम सुरू ; नगर परिषदेने दिले बांधकाम तोडण्याचे आदेश

उरण : प्रतिनिधी

उरण नगर परिषदेमध्ये प्रभाग क्र. 7 मधील म्यु.घ.न. 194 हे शहरातील बाजारपेठेमध्ये असणारे घर उरण नगर परिषदेची नवीन बांधकाम करण्यासंदर्भात कोणतीही पूर्वपरवानगी न घेता तोडून त्या जागेवर नवीन बांधकाम सुरू केले आहे. त्यामुळे उरण नगर परिषदेच्या प्रशासनाने सदरचे बांधकाम त्वरित थांबविण्यात यावे व नव्याने बांधण्यात आलेले काम त्वरित निष्कासित करून जागा होती त्या स्थितीत त्वरित करावी, अशी नोटीस मजलीसे खैरुद्दीन सेन ट्रस्ट उरण आणि या जागेत असणारे भोगवटादार बाबुलाल मुलचंद सांखला यांना बजावली आहे.

सदरच्या बांधकामाबाबत उरणमधील नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू असून बांधकामाची पूर्वपरवानगी न घेता केवळ दुरुस्तीच्या नावाखाली सुरू असणार्‍या या नवीन अनधिकृत बांधकामाबाबत नगर परिषद कोणता निर्णय घेते याकडे उरणवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. बाजारपेठेमध्ये मजलीसे खैरुद्दीन ट्रस्टची जागा असून या जागेत घर आहे. त्याचा मु.घ.नं 194 असा आहे. काही दिवसांपूर्वी येथील जुने घर तोडून येथे नवीन घराचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. उरण नगर परिषदेकडे तक्रारी अर्ज आल्यानंतर उरण परिषदेने त्या अर्जाची दखल घेत प्रभाग क्र. 7चे क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडून चौकशीचा माहिती अहवाल मागितला होता व त्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद नगर पंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम 1965 चे कलम 189, तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनिम 1966चे कलम 53 व 54 अन्वये बांधकामाची नोटीस मजलीसे खैरुद्दीन सेन ट्रस्ट उरण आणि भोगवटादार बाबुलाल मुलचंद सांखला यांना बजावली आहे.

सदर व्यक्तींनी कलम 189 व कलम 45 अन्वये आवश्यक असलेला विकास बांधकाम परवाना न घेता जुने घर पाडून नवीन घराचे अनधिकृत बांधकाम सुरू केले असल्याने सदरचे बांधकाम 30 दिवसाच्या आत स्वखर्चाने निष्कासित करून टाकावे व जागा पूर्ववत करावी, असा आदेश नोटीसद्वारे देण्यात आला आहे. या आदेशात पुढे असे म्हटले आहे की पूर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे काम पूर्ण करणे हा कायद्याने गुन्हा आहे व कायद्यातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यास पात्र आहे, तरी हे बांधकाम त्वरित तोडून जागा पूर्ववत करावी, असे बजाविलेल्या नोटीसमध्ये आदेश दिले आहे.

उरणमध्ये मोठ्या प्रमाणात विविध ट्रस्टच्या जागा आहेत. या जागांवरही अतिक्रमण करून अनधिकृत बांधकामे होत आहेत. मजलीसे खैरुद्दीन ट्रस्टची जागा भर बाजारपेठेत आहे. त्यामुळे या बांधकामावर नगर परिषद कोणती कारवाई करते की कुणाच्या आशीर्वादाने अशा अनधिकृत बांधकामांना अभय देते. याकडे उरण शहरातील सूज्ञ नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply