गुवाहाटी ः वृत्तसंस्था
आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने 17 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी (21 फेब्रुवारी) दारू प्यायल्यानंतर काही जण आजारी पडले होते. दारू प्यायल्याने अनेकांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी तातडीने गोलाघाट येथील शहीद कुशल कंवर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विषारी दारू प्यायल्याने 21 लोकांची तब्येत अचानक बिघडली होती. रुग्णालयात उपचार सुरू असताना 17 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अद्यापही अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी पोलिसांनी दारूचे नमुने घेतले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. विषारी दारू ही शहराच्या बाहेरून आणली होती. ही दारू उत्पादन शुल्काच्याच काही कर्मचार्यांनी आणल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. प्रशासनाने याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये विषारी दारू प्यायल्याने याआधी तब्बल 92 जणांचा मृत्यू झाला आहे. सहारनपूरमध्ये 64, रुरकीमध्ये 20 आणि कुशीनगरमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला होता. सहारनपूरच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 46 जणांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. त्यातील 36 जणांचा मृत्यू विषारी दारूमुळे झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले होते. विषारी दारूमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सहारनपूरच्या 18 लोकांचा उपचारादरम्यान मेरठमध्ये मृत्यू झाला होता. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करू, असे प्रशासनाने सांगितले आहे. याप्रकरणी विविध ठिकाणी छापे मारून आतापर्यंत अनेक जणांना अटक करण्यात आली असून बेकायदा दारू मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आली होती.