Breaking News

धास्तावलेल्या पाकची बचावासाठी भागमभाग!

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

जास्तीत जास्त रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी सज्ज राहा. काही जागा सैनिकांसाठी राखीव ठेवा. जखमी सैनिकांचे वेळीच उपचार होतील याची काळजी घ्या, अशा आशयाची पत्रं पाकिस्तान लष्करानं देशभरातील सर्व रुग्णालयांना लिहिली आहेत. त्याचप्रमाणे देशाच्या सीमेवर राहणार्‍या नागरिकांना दक्षता बाळगण्याचा इशाराही दिला आहे. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध होण्याची चिन्हं असल्यामुळे धास्तावलेल्या पाकिस्तानकडून ही पावले उचलली जात आहेत. पुलवामाचे चोख प्रत्युत्तर दिले जाईल, अशी भूमिका भारत सरकारने घेतल्यानंतर पाकिस्तानमध्ये सैन्याच्या हालचालींना वेग आला आहे. अवघ्या आठवडाभरात पाकिस्तानी सैन्य युद्धासाठी सज्ज झालं आहे. देशातील बहुतेक रुग्णालयांना पाकिस्तानी लष्कराने पत्र लिहिली आहेत. खाजगी रुग्णालयांमध्ये सैनिकांसाठी 25 टक्के बेड आरक्षित करण्यात आले आहेत. सरकारी रुग्णालयांमध्ये कधीही जखमी सैनिक आले तरी त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात येतील अशी व्यवस्था केली जात आहे. यासंदर्भात पाकिस्तान लष्करानं क्वेटाच्या जिलानी हॉस्पीटलला लिहिण्यात आलेलं पत्र हाती लागलं आहे. पूर्व सीमेवर युद्ध झाल्यास क्वेटामध्ये मोठ्या प्रमाणात जखमी सैनिकांवर उपचार करण्यात येतील. सिंध आणि पंजाबमधील जखमी सैनिकांना या परिसरात हलवण्यात येईल. प्राथमिक उपचारांनंतर त्यांना नजीकच्या नागरी रुग्णालयात हलवण्यात येईल, असं या पत्रात सांगितलं आहे. दुसरीकडे पाकव्याप्त काश्मीरमधून दहशतवाद्यांचे तळ हलवण्यात आले आहेत. नागरिकांना कामाशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच घराभोवती बंकर नसतील तर बनवून घ्या. पाळीव प्राणी एलओसी ओलांडणार नाहीत याची दक्षता घ्या, असाही सल्ला देण्यात आला आहे. संपूर्ण देशाला युद्धासाठी सज्ज करण्यात येत आहे. भारताने पाकिस्तानची आर्थिक आणि राजकीय पातळीवर नाकेबंदी केली आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणातही पाकिस्तानला एकटं पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारत एखादं लष्करी ऑपरेशनही करेल अशी शक्यता या वेळी वर्तवली जात आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply