पोलादपूर : प्रतिनिधी
तालुक्यातील आंबेनळी घाटामध्ये शुक्रवारी (दि.28) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्याचा ट्रक दरीमध्ये कोसळला. काही वर्षांपूर्वी याच परिसरामध्ये असेच दोन साखरेचे ट्रक कोसळल्याची घटना झाली होती. या घटनांची ही पुनरावृत्ती मानली जात आहे. सांगली कुंडळगाव येथील क्रांती सहकारी साखर कारखान्याचा पाटील यांचा ट्रक (एमएच 50-2526) घेऊन चालक सचिन दिलीप भिसे (वय 30, मु. पो. मायणी, ता. खटाव, जि. सातारा) हा आंबेनळी घाटाच्या कुंभळवणे गावापुढील सरळ रस्त्याच्या प्रारंभीच्या वळणाजवळ आला असता तेथे वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक दरीमध्ये कोसळला. या वेळी चालक सचिन भिसे आणि क्लिनर अमर मारूती पिसाळ (वय28, मु. पो. चोराडे, ता. खटाव, जि. सातारा) हे ट्रक दरीत कोसळत असताना केबीनबाहेर उडी टाकून जीव वाचविण्यात यशस्वी झाले. या अपघातानंतर पोलादपूरचे सहायक पोलीस निरिक्षक प्रकाश पवार यांच्यासह वाहतुक पोलीस राज पवार, वार्डे तसेच अन्य पोलीस सहकारी आंबेनळी घाटामध्ये वाहनाचा पंचनामा करण्यास तातडीने गेले. यावेळी ट्रकमध्ये 10 टन साखर आणि 1 टन उच्च प्रतीचा गुळ असल्याची माहिती चालक भिसे याने पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलादपूर पोलीस अधिक तपास करीत असून दरीत कोसळलेल्या साखरेच्या पिशव्यांची संख्या माल 10 टन असण्याबाबत साशंकता वर्तविण्यास कारणीभूत ठरत असूनही यापूर्वीच्या अपघातांवेळी देखील अपघातस्थळी कणभर साखर न सांडताही अनुक्रमे 10 टन आणि 17 टन साखर वाया गेल्याचे पंचनामे झाल्याची चर्चा आहे.