Breaking News

पनवेल परिसरात नव्याने जलाशय निर्मितीसाठी शासनाने पुढाकार घ्यावा ; आमदार प्रशांत ठाकूर यांची आग्रही मागणी

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्त

पनवेल परिसरातील वाढती लोकसंख्या आणि पाण्याची गरज लक्षात घेता येथे नव्याने जलाशय निर्माण करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य विधिमंडळाच्या मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात केली. पनवेल परिसराला मुबलक पाणीपुरवठा व्हावा या दृष्टिकोनातून शासनाने योग्य ती उपाययोजना करावी याकरिता आमदार ठाकूर यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले. पनवेल महापालिकेसह तालुक्यातील नागरीकरण  झपाट्याने वाढत आहे. विविध विकास प्रकल्प व वाढती लोकसंख्या विचारात घेता येथील नागरिकांची तहान भागविण्यासाठी भविष्यकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे. ती लक्षात घेऊन आमदार प्रशांत ठाकूर सभागृहात म्हणाले की, पनवेल महापालिका स्थापन झाल्यानंतर या परिसरात असलेले वेगवेगळ्या पद्धतीचे उद्योग, तसेच नव्याने निर्माण होत असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ व त्याच्या अनुषंगाने येथे निर्माण झालेले नैना प्राधीकरण या सर्वांमुळे परिसराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, मात्र या परिसरात उपलब्ध असलेल्या जलाशयांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे नव्याने जलाशय निर्माण करणे आवश्यक असून, त्याकरिता शासनाने पुढाकार घ्यावा आणि येथील पाण्याची वाढती गरज भागविण्याच्या दृष्टिकोनातून तातडीने व्यवस्था करावी.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply