खारघर : प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्था सातारा, सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी पार्क पुणे आणि टाटा टेक्नॉलॉजीज लि. यांच्या संयुक्त विद्यमाने खारघर सेक्टर 11 येथे उभारण्यात आलेल्या रयत सेन्टेनरी सेंटर फॉर इन्व्हेशन, इनोव्हेशन अॅण्ड इक्युबेशन (आरसी-सीआयआयआय)चे उद्घाटन शुक्रवारी (दि. 28) ‘रयत’चे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे, तर सन्माननीय अतिथी म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई चौगुले, प्रा. एन. डी. पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, डॉ. प्रतापराव पवार आदी मान्यवरांसह शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
या वेळी शरद पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की, काळानुरूप बदलाची नोंद करून रयत शिक्षण संस्था पुढे वाटचाल करीत आहे. कमवा आणि शिका या ब्रीदवाक्याप्रमाणे नवीन पिढीला आपल्या पायावर उभे राहण्यासाठी संस्था प्रोत्साहन देत असून, या संस्थेमार्फत नवीन उद्योजक व व्यावसायिक घडविण्याचे काम सुरू आहे. स्थानिकांनादेखील याचा फायदा होईल.
डॉ. राजेंद्र जगदाळे यांनी या केंद्राचा वापर कशाप्रकारे होणार आहे याची माहिती देत लघु सुक्ष्म उद्योगांमध्ये कार्यरत असलेल्या अभियंत्यांना त्यांच्या प्रोडक्टवर संशोधन करण्याची संधी या केंद्रात मिळणार आहे, असे नमूद केले, तर डॉ. अनिल पाटील यांनी संस्थेच्या वाटचालीची माहिती दिली.
रयत शताब्दी प्रशिक्षण केंद्र नवीन होतकरू व्यावसायिक, उद्योजक व संशोधकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रमुख भूमिका बजावणार आहे. त्यांना प्रशिक्षण, उद्योग व व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक गरजा हे केंद्र पूर्ण करणार आहे.
– लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे मोलाचे योगदान
समाजकारणाबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणारे ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या केंद्राच्या उभारणीसाठी मोठी आर्थिक मदत केली आहे. त्याचप्रमाणे या केंद्रातून विशेष गुण प्राप्त करून उत्तीर्ण होणार्या 50 विद्यार्थ्यांना ते दरवर्षी स्कॉलरशीप देणार आहेत. याबद्दल उद्घाटन समारंभात त्यांचा सन्मान करण्यात आला.