Breaking News

नागरिकांनी स्वच्छतेप्रति सजग राहण्याची गरज

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महापालिकेने ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची नागरिकांना सवय लावल्यास महापालिका खर्‍या अर्थाने स्मार्ट सिटी बनेल, असे महापालिकेला स्वच्छ भारत सर्वेक्षण 2020 मध्ये राज्यात पाचवा, तर देशात 20वा क्रमांक मिळाल्यानंतर त्याचा आनंद व्यक्त करताना पनवेलकर नागरिकांना  वाटत आहे. 

पनवेल नगरपरिषदेची ऑक्टोबर 2016मध्ये महापालिका होताना शासनाने पूर्वीच्या ग्रामपंचायत हद्दीतील गावे आणि स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणार्‍या खारघरसह सिडको वसाहतीचा त्यामध्ये समावेश केला. त्यामुळे 10 लाखा पेक्षा जास्त  लोकसंख्या आणि 110 चौ. की. मी. क्षेत्रफळ झाले आहे. एवढ्या मोठ्या क्षेत्रात स्वच्छ भारत अभियान राबविणे सोपे नसल्याने तत्कालीन महापालिका आयुक्त गणेश देशमुख आणि विद्यमान आयुक्त सुधाकर देशमुख आणि त्यांच्या सहकार्यांनी स्वच्छ भारत अभियान राबवण्यासाठी अनेक प्रयोग केले. महापालिका क्षेत्रात समावेश असलेल्या तिन्ही भागात सफाईचा ठेका साई गणेश इंटरप्राईजेसला देण्यात आला. त्यांनी शहरातील रस्त्यावारील कचरा दोन वेळा साफ करतानाच चाळ टाईप भागात दिवसातून दोन वेळा घंटा गाडीने कचरा उचलण्यास सुरुवात केली. त्यामुळे रस्त्यावरील कचरा कमी झाला. 

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी हॉटेल आणि सोसायटींसाठी स्पर्धा आयोजित केल्या त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महापालिका प्रशासनाने ही त्यांना चांगली साथ दिली.त्यामुळे मागील वर्षी स्वच्छ भारत सर्वेक्षणात पनवेल महापालिका देशात 86 व्या आणि राज्यात 25व्या स्थानावरून देशात 20 व्या आणि राज्यात पाचव्या स्थानावर आली. सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि अधिकारीवर्गाने हातात हात घालून एकदिलाने काम केल्यानेच हे नेत्रदीपक यश साध्या झाले आहे याबद्दल सर्वांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत असताना अनेक सोसायटीत ओला आणि सुका कचरा वेगळा केला जात आहे. पण संपूर्ण महापालिका हद्दीत त्याची  नागरिकांना सवय लावण्याची गरज गरज असून त्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत अनेकांनी या वेळी व्यक्त केले.

खारघरमधील कचरा उचलण्याची व्यवस्था सिडको कडे असताना बिकट अवस्था होती. महापालिकेकडे आल्यावर त्यामध्ये सुधारणा झाली मे. साई गणेश इंटरप्राईजेसची घंटा गाडी दारात येऊ लागल्याने नागरिक कचरा रस्त्यावर टाकत नाहीत. त्यामुळे परिसर स्वच्छ दिसतात हा बदल स्वागतार्ह आहेच. आम्ही नगरसेवक सोसायटीत ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी प्रबोधन करीत आहोत त्याला सोसायटीत चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याला प्रशासनाचे सहकार्य मिळाल्यास स्मार्ट सिटी खर्या अर्थाने स्मार्ट बनलेली पाहायला मिळेल.

– हर्षदा उपाध्याय, नगरसेविका, खारघर 

आमच्या नवीन पनवेल सेक्टर 7 मध्ये यापूर्वी नियमित कचरा उचलला जात नव्हता. स्वच्छ भारत सर्वेक्षण 2020मुळे रोज कचरा उचलण्यासाठी सकाळी घंटा गाडी सुरू झाली. त्यामुळे रस्त्यावर कोणी कचरा टाकत नसल्याने परिसर स्वच्छ दिसतो.स्पर्धेनंतरही कचरा उचलला जात आहे हे विशेष.

गीता जोसेफ, शिक्षिका, सेक्टर 7

आमच्या सिडको कॉलनीत यापूर्वी दोन-तीन दिवसांनी कचरा उचलला जायचा त्यामुळे रस्त्यावर घाण असायची आता रोज दोन वेळा कचरा गाडी येत असल्याने परिसर स्वच्छ दिसतो. सर्वेक्षणात महापालिकेला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन!

– दीपक मढवी, ए टाईप, सेक्टर 13

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply