आठ जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
पुणे : प्रतिनिधी
कोंढवा भागात सोसायटीची सरंक्षक भिंत कोसळून 15 बांधकाम मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना रात्री घडली. ढिगार्याखालून तिघांना जिवंत काढण्यात यश आले आहे. दरम्यान, या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या आठ जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोंढव्यातील बडा तालाब मस्जिद परिसरात आल्कन स्टायलस या सोसायटीच्या बाजूला इमारतीचे काम सुरू होते. त्याचा पाया बांधण्यासाठी 40 ते 50 फूट खड्डा खोदण्यात आला होता. या बांधकामासाठी आलेल्या मजुरांच्या झोपड्या सोसायटीच्या संरक्षक भिंतीला लागून बांधण्यात आल्या होत्या. रात्री दीडच्या सुमारास सोसायटी पार्किंगची संरक्षण भिंत खचून दुर्घटना घडली.
महापौर मुक्ता टिळक यांनी शनिवारी (दि. 29) सकाळी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दरम्यान, दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख आणि जखमींना 25 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.