राष्ट्रवादीच्या कारभाराचा शिवसेनेकडून निषेध
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
येथील महानगरपालिका सभागृहात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने परिवहन समिती सदस्य निवडणुकीत नियमाला बगल देत शिवसेनेच्या सदस्यांना पदापासून वंचित ठेवले. त्यामुळे संतापलेल्या शिवसेनेने राष्ट्रवादीच्या एककल्ली कारभाराचा निषेध केला.
नवी मुंबई महापालिका परिवहन समितीच्या सदस्यांची निवड शनिवारी (दि. 29) होणार होती. 2007पासून परिवहन समितीवर निवडून आलेल्या राजकीय पक्षांच्या नगरसेवक संख्येच्या आधारावर सदस्य घेतले जात होते. यानुसार परिवहन सदस्य निवडणुकीत राष्ट्रवादीचे चार व शिवसेनेचे दोघे निवडून जाणार होते, मात्र सत्ताधारी राष्ट्रवादीने नगरसेवकांच्या संख्येवर विरोधी पक्षाला प्रतिनिधित्व न देता सरळ हात वर करून निवडणूक घेतली.
राष्ट्रवादीच्या या रडीच्या डावामुळे शिवसेनेचे दोन सदस्य परिवहन समितीवर जाऊ शकले नाहीत. या वेळी सेनेने सभागृहात संताप व्यक्त करीत महापौरांचा निषेध केला, तसेच आयुक्तांच्या समोर ठेवलेला राजदंड पळवला. राष्ट्रवादीने हुकूमशाही पद्धत सुरू केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.